गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 11:02 IST2025-05-13T11:02:14+5:302025-05-13T11:02:50+5:30
Shashi Tharoor on America: भारत-पाकिस्तान युद्धविरामाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर शशी थरुर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
Shashi Tharoor on America: गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवण्यासाठी 10 मे रोजी युद्धविराम जाहीर करण्यात आला. पण, यावरुन भारतातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या युद्धविरामाची घोषणा केल्यामुळे विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करत आहेत. शिवसेना आणि काँग्रेसने याबाबत सरकारकडे संसद अधिवेशन बोलावण्याची मागणीही केली आहे. यातच आता काँग्रेस नेते शशी थरुर यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
काय म्हणाले शशी थरुर?
अमेरिकेने भारत-पाकिस्तान युद्धविराम घोषित केल्याबद्दल थरुर म्हणतात, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता. ते गुन्हेगार आणि पीडित व्यक्तीला एकच दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते दक्षिण आशियाई देशांच्या अंतर्गत मुद्द्यांवर अनावश्यक भाष्य करत आहेत. आपल्या विधानांद्वारे ते भारत आणि पाकिस्तानला एकाच तराजूत चुकीच्या पद्धतीने तोलण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी प्रतिक्रिया थरुर यांनी दिली.
Mr Trump’s post is disappointing for India in four important ways: First, it implies a false equivalence between the victim and the perpetrator, and seemingly overlooks the US’ own past unwavering stance against Pakistan’s well-documented links to cross-border terrorism. Second,… https://t.co/Za5cvwq82M
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) May 12, 2025
या 4 मुद्द्यांवर नाराजी
यासोबतच थरुर यांनी ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या पोस्टबाबत 4 मुद्द्यांद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ट्रम्प यांची पोस्ट चार महत्त्वाच्या बाबतीत भारतासाठी निराशाजनक आहे. पहिले, त्यांची पोस्ट पीडित आणि गुन्हेगार यांच्यात समानता निर्माण करते आणि सीमापार दहशतवादाशी पाकिस्तानच्या संबंधांविरुद्ध अमेरिकेच्या पूर्वीच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करते. दुसरे म्हणजे, भारत कधीही दहशतवाद्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवून वाटाघाटी करणार नाही.
ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्न सोडवण्याबद्दल भाष्य केले होते, त्यानंतर वाद आणखी वाढला. शशी थरुर म्हणाले की, काश्मीर मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण करणे चुकीचे आहे, दहशतवाद्यांनाही हेच हवे आहे. हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे, यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये. भारताने पाकिस्तानसोबतच्या समस्यांवर कधीही कोणत्याही परदेशी देशाकडून मध्यस्थीची मागणी केलेली नाही आणि करण्याची शक्यताही नाही. चौथे, जागतिक नेत्यांना त्यांचा भारत दौरा पाकिस्तान दौऱ्यासोबत एकत्र करू नयेत, असे सांगण्यात आले आहे. 2000 मध्ये राष्ट्राध्यक्ष क्लिंटनपासून याची सुरुवात झाली आहे, अशी प्रतिक्रिया शशी थरुर यांनी दिली.
ट्रम्प यांच्या कोणत्या पोस्टने गोंधळ उडाला?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, जर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबला नसता तर अमेरिकेने व्यापार थांबवला असता. परंतु या दाव्याला भारताकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही.