“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 17:32 IST2025-10-04T17:30:40+5:302025-10-04T17:32:23+5:30
Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: सोनम वांगचूक यांच्या पत्नीचा फोन आला होता. त्यांच्यावर अन्याय झाला आहे. देशद्रोह्याची कलमे काढून टाकावीत, असे शंकराचार्यांनी म्हटले आहे.

“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: सोनम वांगचूक यांच्याबद्दल संपूर्ण देशाला माहिती आहे. नवीन पिढीसाठी त्यांचे जे योगदान होते, ते अधोरेखित करण्यासाठी त्यांच्या जीवनावर चित्रपट काढण्यात आला. तो सगळ्या देशवासीयांनी उचलून धरला. त्या चित्रपटाला चांगले यश मिळाले. त्यानंतर भारत सरकारने सोनम वांगचूक यांना सन्मानित केले. जेव्हा भारत सरकार एखाद्या व्यक्तीला सन्मानित करते, तेव्हा त्या माणसाविषयी सगळी माहिती आधी घेतलेली असते. ती व्यक्ती चुकीच्या कामात गुंतलेली नाही ना. गुप्तचर विभागाकडून माहिती घेतली जाते. चुकीच्या माणसाला सन्मानित केले जात नाही, याची खात्री केली जाते. अशा वेळेस सोनम वांगचूक यांना सन्मानित केले, तेव्हा ती सगळी माहिती घेतली असणार, मग आता त्यांच्यावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल करणे चिंताजनक आहे, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी म्हटले आहे.
लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर सोनम वांगचूक यांना २६ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. सोनम वांगचूक यांना जोधपूर मध्यवर्ती तुरुंगात पाठवण्यात आले आहे. २४ सप्टेंबरच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात चार जणांचा मृत्यू झाला. संतप्त विद्यार्थ्यांनी भाजप कार्यालय पेटवून दिले होते. यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी प्रतिक्रिया दिली.
सोनम वांगचूक यांना जेलमधून सोडून द्यावे
सोनम वांगचूक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याने चांगले लोकही घाबरले आहेत. आम्ही एखादे चांगले काम करायला गेलो, तर आम्हालाही त्रास दिला जाऊ शकतो. त्यामुळे सोनम वांगचूक यांच्यावरील अशा प्रकारची कलमे काढून टाकायला हवीत. तसेच सोनम वांगचूक यांना जेलमधून सोडून द्यावे, अशी मागणी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी केली.
सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांचा फोन आला होता
पर्यावरणासाठी ते लढाई लढत होते. लेह-लडाखमधील नागरिकांसाठी ते लढाई लढत होते. आम्हीही आधी सोनम वांगचूक यांना पाठिंबा दिला आहे. कुंभमेळ्यात सोनम वांगचूक स्वतः आले होते. त्यांच्या कार्याबाबत त्यांनी माहिती दिली होती. अधून-मधून आमच्याशी संपर्क साधत होते. त्यांची पत्नी गीतांजली यांचा आम्हाला फोन आला होता. त्यांनी सांगितले की, त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे या प्रकरणी सरकारने पुनरीक्षण करावे. तत्कालीन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जर त्यांना अटक करण्यात आली असेल तर काही हरकत नाही. परंतु, दीर्घ काळापर्यंत देशद्रोह्याच्या गुन्ह्याखाली त्यांच्यावर खटला चालवणे योग्य होणार नाही. संपूर्ण विश्वात आपली मानहानी होईल, असे शंकराचार्यांनी सांगितले.