दहशतवादी हल्ल्यामुळे हादरले! आता CM अब्दुल्लांनी दिली ताकद, पहलगामध्येच घेतली मंत्रिमंडळ बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 17:29 IST2025-05-27T17:26:56+5:302025-05-27T17:29:19+5:30
महिनाभरापूर्वी म्हणजे २२ एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर तब्बल २६ पर्यटकांची दहशतवाद्यांनी हत्या केली. या घटनेनंतर पहलगामला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी अब्दुल्ला सरकारने महत्त्वाची गोष्ट केली.

दहशतवादी हल्ल्यामुळे हादरले! आता CM अब्दुल्लांनी दिली ताकद, पहलगामध्येच घेतली मंत्रिमंडळ बैठक
पहलगामला लागून असलेल्या बैसरन पठारावर देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या तब्बल २६ पर्यटकांची हत्या दहशतवाद्यांनी केली. या घटनेनंतर पहलगामवर मोठा आर्थिक आघात झाला. दहशतवाद्यांना कडक संदेश देण्यासाठी आणि येथील पर्यटनाला चालना मिळावी म्हणून मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी येथेच मंत्रिमंडळाची बैठक घेतली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच पारंपरिक मंत्रिमंडळ बैठक श्रीनगर येथे न घेता मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाम येथे घेतली. ही बैठक देशविरोधी आणि समाजविघातक शक्तींना एक कठोर संदेश देण्यासाठी आणि जम्मू काश्मीरमध्ये हिंसेला अजिबात स्थान नसल्याचे सांगण्यासाठी घेण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
ओमर अब्दुल्लांनी शेअर केले फोटो
जम्मू काश्मीर सरकारची मंत्रिमंडळ बैठक पहलगाममध्ये झाली. या बैठकीपूर्वी ओमर अब्दुल्ला यांनी नदीकाठी बसून वेळ घालवला. यावेळी त्यांनी काही फोटोही शेअर केले.
In Pahalgam to chair a cabinet meeting. We came to express solidarity with the local population. We’ve also come to thank all the tourists who are slowly making their way back to Kashmir & to Pahalgam. pic.twitter.com/VhKVyWV4Kd
— Omar Abdullah (@OmarAbdullah) May 27, 2025
पहिल्यांदाच पहलगाममध्ये झालेल्या या बैठकींबद्दल उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी म्हणाले, 'पहलगाममध्ये कॅबिनेट बैठक घेऊन आम्ही जगाला हा संदेश दिला आहे की, जम्मू काश्मीर शांतता प्रिय भूमी आहे आणि बंधुत्वासाठी ओळखली जाते.'
'काही लोकांनी चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. पण, जम्मू काश्मीर पूर्वीही कणखर आणि एकजूट होता आणि पुढेही राहील. या कॅबिनेट बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली आहे', असेही ते म्हणाले.
'रक्तपात आणि हिंसा आम्हाला उद्दिष्टांपासून भरकटवू शकत नाही'
या बैठकीबद्दल बोलताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, जम्मू आणि श्रीनगर बाहेर पहिल्यांदाच बैठक होत आहे. आम्ही इथे ही बैठक यासाठी घेतली की, रक्तपात आणि हिंसा आम्हाला आमच्या ध्येयापासून भरकटवू शकत नाही. विकास, समृद्धी आणि जम्मू काश्मीरच्या लोकांचे कल्याण हाच आमचा अजेंडा आहे', असे ते म्हणाले.