Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 17:36 IST2025-10-07T17:34:38+5:302025-10-07T17:36:38+5:30
हरियाणा पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांच्या आत्महत्येने चंदीगडसह संपूर्ण देशात खळबळ माजली आहे.

Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
हरियाणा पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. चंदीगडमधील त्यांच्या सरकारी निवासस्थानी त्यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमुळे हरियाणा आणि चंदीगड पोलीस दलात खळबळ उडाली.
चंदीगडच्या सेक्टर ११ येथील सरकारी निवासस्थानाच्या बेसमेंटमध्ये मंगळवारी दुपारी वाय. पूरन कुमार यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. सर्वप्रथम त्यांच्या मुलीच्या ही बाब लक्षात आली, तिने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर चंदीगड पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना घटनास्थळावरून एक पिस्तूल मिळाले आहे. मृतदेह सेक्टर १६ मधील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
पत्नी परदेशात असताना आत्महत्या
वाय. पूरन कुमार यांच्या पत्नी अमनीत पी. कुमार या देखील आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या शिष्टमंडळासह जपानच्या दौऱ्यावर आहेत. पत्नी परदेशात असताना पूरन कुमार यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने गूढ निर्माण झाले आहे.
पोलीस तपास सुरू
वाय. पूरन कुमार हे २०१० बॅचचे हरियाणा कॅडरचे आयपीएस अधिकारी होते. पूरन कुमार हे त्यांच्या विभागातील भेदभाव, मनमानी आणि बेकायदेशीर आदेशांविरुद्ध आवाज उठवणारे अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या आत्महत्येमुळे प्रशासकीय वर्तुळात अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण झाले आहेत.
वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द
डीजीपींवरील गंभीर आरोप: जुलै २०२० मध्ये, त्यांनी तत्कालीन डीजीपी मनोज यादव यांच्यावर जातीय भेदभावामुळे आणि वैयक्तिक वैमनस्यामुळे त्यांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांना अनेकदा त्यांच्या कॅडरबाहेर पोस्टिंग देण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला होता.
न्यायालयीन याचिका: पूरन कुमार यांनी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव अरोरा यांच्यावर पक्षपाती तपास अहवाल तयार केल्याचा आरोप केला होता. त्यांनी या संदर्भात हरियाणा उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल केल्या.
प्रशासकीय निर्णयांना आव्हान: पोलीस विभागातील पदांची निर्मिती, अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि घरांचे वाटप यांसारख्या प्रशासकीय निर्णयांच्या वैधतेवर त्यांनी उच्च न्यायालयात प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
सरकारी आदेशांना विरोध: वित्त विभागाच्या परवानगीशिवाय नवीन पोलीस पदे निर्माण करण्याच्या हरियाणा सरकारच्या आदेशाला त्यांनी आव्हान दिले होते. एकाच अधिकाऱ्याला दोन सरकारी निवासस्थाने देणे हे नियमांचे उल्लंघन आहे, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता.
निवडणूक आयोगाकडे तक्रार: २०२४ मध्ये, त्यांनी डीजीपी शत्रुघ्न कपूर यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. हरियाणा पोलीस सेवा अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या बदल्या सरकारी आदेशाच्या विरुद्ध असून त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली होती.