Sharad Pawar: गुलामनबी आझाद यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 10:04 IST2022-03-31T10:01:24+5:302022-03-31T10:04:11+5:30
राष्ट्रवादीच्या या प्रस्वानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनी शरद पवारांची दिल्लीत भेट घेतली.

Sharad Pawar: गुलामनबी आझाद यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण
भाजपाला थोपवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली जात असताना आज दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महत्वाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. देशातील सध्याच्या कठीण राजकीय परिस्थितीत शरद पवार यांनीच काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व करावे, असा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला. या बैठकीला स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. सर्वानुमते शरद पवारांनी नेतृत्व करावं यासाठीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे देशातील सर्वात अनुभवी संसदीय नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी संरक्षण आणि कृषी मंत्री म्हणून देशाच्या विकासात उल्लेखनीय योगदान दिलं आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे. सध्या देशात सर्व बिगर-भाजप राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना एकत्र आणण्यात शरद पवार हे मोठी भूमिका बजावू शकतात'', असं मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी या बैठकीत व्यक्त केलं.
राष्ट्रवादीच्या या प्रस्वानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनी शरद पवारांची दिल्लीत भेट घेतली. काँग्रेस नेतृत्वात बदल करण्याची मागणी करणाऱ्या 'G-23' या नेत्यांच्या गटाचे सदस्य गुलाम नबी आझाद यांनी बुधवारी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीचे महत्व वाढले आहे.
दरम्यान, काँग्रेस नेतृत्व करु शकत नाही असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे म्हणणे आहे. शरद पवारच देशातील विरोधकांना एकत्र आणू शकतात आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपाला रोखले जाऊ शकते, असे या ठरावात म्हटले आहे. या ठरावानंतर आता काँग्रेस आणि युपीएतील घटक पक्ष काय भूमिका घेतात देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ममता बॅनर्जींनीही लिहिलं पत्र-
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाजपा विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. यात भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असून लोकशाहीच्या तत्वांची हत्या केली जात असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी पत्रात केला आहे. त्यामुळे आता भाजपा विरोधी पक्षांनी आता एकत्र येण्याची वेळ आली असून भाजप विरोधात एकत्र यायला हवं, असं आवाहन बॅनर्जी यांनी केलं आहे. तसंच भाजपा विरोधी पक्षांची एक सर्वसमावेशक बैठक आयोजित केली जावी असंही बॅनर्जी यांनी पत्रात म्हटलं आहे.