भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष वयाच्या ६१ व्या वर्षी बांधणार लग्नगाठ, पक्षाच्या महिला कार्यकर्तीसोबत अडकणार विवाह बंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 21:14 IST2025-04-17T21:13:26+5:302025-04-17T21:14:11+5:30
Dilip Ghosh Marriage: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालमधील माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष वयाच्या ६१ व्या वर्षी विवाह बंधनात अडकणार आहेत. माजी खासदार आणि माजी आमदार असलेले दिलीप घोष हे शुक्रवारी न्यू टाऊन स्थित आपल्या निवासस्थानी साधेपणाने होणाऱ्या विवाह सोहळ्यात रिंकू मजूमदार यांच्यासोबत लग्नगाठ बांधतील.

भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष वयाच्या ६१ व्या वर्षी बांधणार लग्नगाठ, पक्षाच्या महिला कार्यकर्तीसोबत अडकणार विवाह बंधनात
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालमधील माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष वयाच्या ६१ व्या वर्षी विवाह बंधनात अडकणार आहेत. माजी खासदार आणि माजी आमदार असलेले दिलीप घोष हे शुक्रवारी न्यू टाऊन स्थित आपल्या निवासस्थानी साधेपणाने होणाऱ्या विवाह सोहळ्यात रिंकू मजूमदार यांच्यासोबत लग्नगाठ बांधतील.
दिलीप घोष यांच्या होणाऱ्या पत्नी रिंकू मजूमदार ह्या भाजपाच्या दक्षिण कोलकातामधील सक्रिय नेत्या आणि कार्यकर्त्या आहेत. पक्षाचं काम करत असतानाच दोघेही एकमेकांना भेटले होते. तसेच आता ते विवाह बंधनात अडकणार आहेत. दिलीप घोष यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर दिलीप घोष हे निराश झाले होते. त्यावेळी आपण एकत्र येऊया, असा प्रस्ताव रिंकू मजूमदार यांनी दिलूप घोष यांना दिला होता. रिंकू यांच्या कुटुंबात आता कुणीही नसून त्या दिलीप घोष यांच्यासोबत राहू इच्छित आहेत.
आतापर्यंत अविवाहित असलेल्या दिलीप घोष यांनी रिंकू मजूमदार यांनी दिलेला लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता. मात्र आईने आग्रह केल्यानंतर ते लग्नास तयार झाले. सहा महिन्यांपूर्वीपर्यंत दिलीप घोष यांनी विवाहाबाबत विचारही केला नव्हता. मात्र जीवनातील हा महत्त्वाचा टप्पाही पार केला पाहिजे, असे त्यांना वाटू लागले. दरम्यान, ३ एप्रिल रोजी ईडन गार्डवर झालेल्या आयपीएलचा सामना होणारी पत्नी आणि सासरच्या मंडळींसोबत पाहत दिलीप घोष यांनी या नात्याची अनौपचारिकरीत्या कबुलीच दिली होती.
दरम्यान, दिलीप घोष यांचा विवाह निश्चित झाल्याची वार्ता पसरल्यानंतर प्रसारमाध्यमांमध्येही चर्चांना उधाण आले होते. याबाबत दिलीप घोष यांना विचारले असता त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिले. मी लग्न करू शकत नाही का? लग्न करणं हा गुन्हा आहे का? असे ते म्हणाले. दिलीप घोष यांनी आपण लग्न करणार असल्याचं थेटपणे सांगितलं नाही. मात्र त्यांनी हे वृत्त नाकारलंही नाही. याबाबत काही माध्यमांशी संपर्क साधला असता त्यांनी काही उत्तर दिलं नाही. मात्र त्यांच्या निकवर्तीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच त्यांनी नेहमीप्रमाणे धाडसी निर्णय घेतला आहे, असे सांगितले.