माजी परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांच्या मुलाचा अपघात; सून चित्रा यांचा मृत्यू, मानवेंद्र गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 19:22 IST2024-01-30T19:19:15+5:302024-01-30T19:22:54+5:30
माजी खासदार मानवेंद्र सिंह हे त्यांच्या पत्नीसह भाजपा सोडून २०१८ मध्येच काँग्रेसमध्ये दाखल झाले.

माजी परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांच्या मुलाचा अपघात; सून चित्रा यांचा मृत्यू, मानवेंद्र गंभीर जखमी
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांचा मुलगा मानवेंद्र सिंह आणि त्यांची पत्नी चित्रा सिंह यांच्या गाडीचा अल्वरमध्ये अपघात झाला. जसवंत सिंह यांची सून चित्रा सिंह यांचा अपघातातमृत्यू झाला आहे. माजी खासदार मानवेंद्र सिंह हे त्यांच्या पत्नीसह भाजपा सोडून २०१८ मध्येच काँग्रेसमध्ये दाखल झाले. मानवेंद्र त्यांच्या मुलासह गंभीर जखमी झाले असून दोघांवर उपचार सुरू आहेत.
मंगळवारी सायंकाळी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर हरयाणा सीमेजवळील अलवरच्या नौगाव जवळ खुशपुरी येथे हा अपघात झाला. या अपघातात बारमेरचे माजी खासदार मानवेंद्र यांच्या पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला. मानवेंद्र सिंह यांच्याशिवाय त्यांचा मुलगा हमीर सिंह देखील जखमी झाला आहे. मानवेंद्र सिंह यांचा मुलगाही कारमध्ये प्रवास करत होता. दोन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना अलवर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, मानवेंद्र सिंह पत्नी आणि मुलासह दिल्लीहून जयपूरला निघाले होते, मात्र अचानक त्यांची कार डिव्हायडरला धडकली. खरं तर हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अपघातात त्यांच्या पत्नीला जीव गमवावा लागला, तर मुलगा हमीर सिंह याच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या. नाकावर व चेहऱ्यावर देखील जखमा आहेत.
माजी खासदार मानवेंद्र हे गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींवर अलवर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुग्णालयात भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे.