Jewellers: आता हिजाब, बुरखा किंवा घुंगट घालून ज्वेलर्समध्ये नो एन्ट्री! पुरुषांसाठीही नियम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 17:29 IST2026-01-07T17:25:26+5:302026-01-07T17:29:37+5:30
Hijab and Burqa Ban In Jewellery Shops: दागिन्यांच्या दुकानातील चोरी आणि दरोड्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी 'ऑल इंडिया गोल्ड अँड ज्वेलर्स असोसिएशन'ने एक मोठा निर्णय घेतला आहे.

Jewellers: आता हिजाब, बुरखा किंवा घुंगट घालून ज्वेलर्समध्ये नो एन्ट्री! पुरुषांसाठीही नियम!
बिहारमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आणि दागिन्यांच्या दुकानांवरील दरोड्यांच्या सत्राला चाप लावण्यासाठी ऑल इंडिया गोल्ड अँड ज्वेलर्स असोसिएशनने एक अत्यंत कडक आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही सराफा दुकानात हिजाब, बुरखा, निकाब किंवा घुंगट परिधान करून येणाऱ्या महिलांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, हेल्मेट किंवा फेटा बांधलेल्या पुरुषांनाही दुकानाबाहेरच थांबावे लागणार आहे.
असोसिएशनचे राज्य अध्यक्ष अशोक कुमार वर्मा यांनी या निर्णयामागची भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही काळात बिहारमधील विविध जिल्ह्यांत दागिन्यांच्या दुकानांमध्ये चोरी, दरोडा आणि गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या गुन्ह्यांच्या तपासात असे दिसून आले की, बहुतेक गुन्हेगार चेहरा झाकून दुकानात प्रवेश करतात. यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत आणि पोलिसांना तपासात अनेक अडचणी येतात.
ज्वेलर्स असोसिएशनने स्पष्ट केले आहे की, दुकानात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा चेहरा स्पष्ट दिसणे आता अनिवार्य आहे. हिजाब, बुरखा किंवा घुंगट असल्यास महिलांचा चेहरा झाकला जातो, त्यामुळे प्रवेश नाकारला जाईल. तर, हेल्मेट मास्क किंवा डोक्याला फेटा बांधल्यास पुरुषांनाही दुकानात प्रवेश दिला जाणार नाही.
या निर्णयामुळे समाजात चर्चा सुरू झाली असली तरी, अशोक कुमार वर्मा यांनी स्पष्ट केले आहे की, "हा निर्णय कोणत्याही विशिष्ट धर्म, जाती किंवा समुदायाच्या विरोधात नाही. व्यापाऱ्याची मालमत्ता सुरक्षित ठेवणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. जर चेहरे उघडे राहिले, तर गुन्हेगारांवर वचक बसेल आणि गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल."