अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 18:22 IST2025-11-23T18:21:49+5:302025-11-23T18:22:02+5:30
अल-फलाह विद्यापीठातील संशयित दहशतवादी डॉक्टरांना अटक झाल्यानंतर फरीदाबादमध्ये पोलिसांचे सर्च ऑपरेशनअधिक तीव्र झाले आहे.

अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
अल-फलाह विद्यापीठातील संशयित दहशतवादी डॉक्टरांना अटक झाल्यानंतर फरीदाबादमध्ये पोलिसांचे सर्च ऑपरेशनअधिक तीव्र झाले आहे. याच मोहिमेअंतर्गत डबुआ येथील त्यागी मार्केट परिसरात असलेल्या जामा मशिदीत पोलिसांनी तपासणी केली असता, त्यांना संशयास्पद वस्तू सापडल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अल-फलाह विद्यापीठातून काही संशयित डॉक्टरांना अटक झाल्यानंतर त्यांचे धागेदोरे परिसरातील अनेक मशिदींच्या इमामांशी जोडलेले असल्याचे उघड झाले होते. याच पार्श्वभूमीवर, पोलीस आणि तपास यंत्रणांनी आज पुन्हा अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवली.
मशिदीत काय सापडले?
या तपासणीदरम्यान, त्यागी मार्केटमधील जामा मशिदीतून पोलिसांना काही संशयास्पद पदार्थ मिळाले. या वस्तूंमध्ये दोन गोण्यांमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आणि एका प्लास्टिकच्या गोणीत काळ्या रंगाची पावडर असे संशयास्पद पदार्थ आढळले आहेत. पोलिसांनी कोणताही धोका न पत्करता हे पदार्थ तत्काळ ताब्यात घेतले आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेली ही संशयास्पद पावडर तात्काळ लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. तपासणीनंतरच या पदार्थाचे स्वरूप आणि ते नेमके काय आहे, याचा खुलासा होऊ शकेल.
संशयास्पद पावडरसोबत अवैध दारूही जप्त!
विशेष म्हणजे, याच शोध मोहिमेदरम्यान पोलिसांनी आणखी दोन ठिकाणी तपासणी केली. त्या ठिकाणांहून अवैध विदेशी आणि देशी दारू जप्त करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून दिल्ली स्पेशल सेल, हरियाणा एसटीएफ आणि इतर तपास यंत्रणांनी नूंह आणि मेवात परिसरात दहशतवादी उमरच्या कनेक्शनची माहिती गोळा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर धाडी टाकल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये उमर हा नूंह-मेवात भागात गाडीतून फिरताना दिसला होता. या तपासणीत अनेकांचे कागदपत्र तपासले गेले, उमरशी संबंधित लोकांची कसून चौकशी करण्यात आली आणि संशयाच्या आधारावर काहींना ताब्यातही घेण्यात आले. फरीदाबादच्या मशिदीत संशयास्पद पावडर मिळण्याची ही घटना याच मोठ्या तपासणीचा एक भाग असल्याचे मानले जात आहे.