पाटण्यात वऱ्हाडाने भरलेली स्कॉर्पियो गंगेत पडली, बोटीवर लोड करण्यात आली होती गाडी; 2 जण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 09:38 IST2022-07-04T09:37:04+5:302022-07-04T09:38:46+5:30
एका बोटीतून दुसऱ्या बोटीत गाडी चढवताना पाऊस आला अन्...

पाटण्यात वऱ्हाडाने भरलेली स्कॉर्पियो गंगेत पडली, बोटीवर लोड करण्यात आली होती गाडी; 2 जण बेपत्ता
पाटणा - पाटण्यावरून वैशाली येथे वऱ्हाड घेऊन जाणारी एक स्कॉर्पिओ गंगा नदीत उलटल्याची घटना घडली आहे. ही घटना फतुहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेठूली गंगा घाटाच्या (Jethuli Ganga Ghat) किनाऱ्यावर घडली. ही स्कॉर्पिओ बोटीवर लोड करण्यात आली होती. एका बोटीवरून दुसऱ्या बोटीवर गाडी लोड करताना हा अपघात झाला. या घटनेनंतर एकच धावपळ उडाली. अपघातात स्कॉर्पिओमध्ये बसलेले दोन लोक अद्यापही बेपत्ता आहेत. तर इतर सहा लोक बाहेर आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच फतुहा पोलीस ठाण्याचे एसडीपीओ राजेश मांझी घटनास्थळी पोहोचले. एनडीआरएफच्या टीमलाही तातडीने पाचारण करण्यात आले होते. NDRF च्या टीमने रात्री 2.30 ते 3 वाजेपर्यंत बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध घेतला. मात्र ते सापडू शकले नाही. या घटनेनंतर लग्नाच्या आनंदाचे रुपांतर किंकाळ्यांमध्ये झाल्याचे दिसून आले.
कंकडबागमधील इंद्रानगर येथील रहिवासी उपेंद्र राय यांचा मुलगा शंभू कुमार याचे लग्न होते. या लग्नाचे व्हऱ्हाड रविवारी राघोपूर दियारामधील मीरपूर येथील सत्येंद्र राय यांच्याकडे जाणार होते. सर्व तयारी झाली होती. या व्हऱ्हाडाची गाडी जेठुली घाटावर बोटीच्या सहाय्याने एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर नेण्यात येत होती. दरम्यान एका बोटीतून दुसऱ्या बोटीत गाडी चढवताना पाऊस आला. यामुळे व्हऱ्हाडातील काही लोक गाडीत बसले. यामुळे बोट ओव्हरलोड होऊन एकाबाजूला कलली आणि गाडी थेट नदीत कोसळली.