अस्थिर कर्नाटक सरकार वाचवण्यासाठी सिद्धारामय्यांनी बनवला 'हा' मास्टरप्लान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 16:16 IST2019-06-19T16:13:44+5:302019-06-19T16:16:04+5:30
कर्नाटकमध्ये सत्तेवर असलेले काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार स्थापनेपासूनच अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर हेलखावे खात असून, लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर ही अस्थिरता अधिकच वाढली आहे.

अस्थिर कर्नाटक सरकार वाचवण्यासाठी सिद्धारामय्यांनी बनवला 'हा' मास्टरप्लान
बंगळुरू - गतवर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा त्रिशंकू निकाल लागल्यानंतर काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देत सरकार स्थापन केले होते. त्यामुळे विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपाला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. मात्र कर्नाटकमध्ये सत्तेवर असलेले काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार स्थापनेपासूनच अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर हेलखावे खात असून, लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर ही अस्थिरता अधिकच वाढली आहे. त्यामुळे हे सरकार वाचवण्यासाठी राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धारामय्या यांनी एक खास मास्टरप्लान तयार केला आहे.
सिद्धारामय्या यांनी आखलेल्या मास्टरप्लाननुसार एच.डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि जेडीएस आघाडी सरकार डिसेंबर महिन्यांपर्यंत टिकल्यास काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेऊन नव्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये संधी देण्यात येईल. त्याद्वारे बंडाचा सूर आळवणाऱ्या आमदारांना शांत करता येईल, असा होरा आहे.
कर्नाटक सरकारमध्ये मंत्री असलेल्या आर.बी. तिम्मापूर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चांना बळ मिळाले आहे. जर पक्षनेतृत्वाने आम्हाला राजीनामा देण्यास सांगितले, तर डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही निश्चितपणे राजीनामा देऊ, असे त्यांनी सांगितले. यादरम्यान, त्यांनी एच. नरेश आणि आर. शंकर या दोन अपक्ष आमदारांना मंत्री बनवण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला, असे केल्यामुळे आम्ही आपले सरकार वाचवू शकतो, अशे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष ए.एच. विश्वनाथ हे आपला राजीनामा मागे घेऊ शकतात. माजी पंतप्रधान आणि पक्षाचे संस्थापक एच. डी. देवेगौडा यांनी विश्वनाथ यांच्याशी चर्चा करून त्यांची मनधरणी केली आहे.