बुंदेलखंड एक्स्प्रेस मार्गाला अटलबिहारी वाजपेयींचे नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 13:23 IST2018-08-22T13:22:27+5:302018-08-22T13:23:07+5:30
या मार्गाचे नाव आत अटल पथ असे करण्यात येईल. उत्तर प्रदेशात योगी सरकारने वाजपेयी यांच्या स्मरणार्थ अनेक योजनांची घोषणा केली आहे.

बुंदेलखंड एक्स्प्रेस मार्गाला अटलबिहारी वाजपेयींचे नाव
नवी दिल्ली- उत्तर प्रदेश सरकारने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ बुंदेलखंड एक्स्प्रेस मार्गाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची घोषणा केली आहे. या मार्गाचे नाव आत अटल पथ असे करण्यात येईल. उत्तर प्रदेशात योगी सरकारने वाजपेयी यांच्या स्मरणार्थ अनेक योजनांची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यापुर्वीच उत्तर प्रदेशातील काही योजना अटलजींच्या नावाने राबविण्याचे जाहीर केल्याचे उत्तर प्रदेशचे परविहन मंत्री स्वतंत्र देव सिंह यांनी स्पष्ट केले. त्यानुसार राज्य सरकार अधिसूचनाही जाहीर करणार आहे.
बुंदेलखंड एक्स्प्रेस मार्ग 289 किमी लांबीचा चार पदरी असेल. तो झाशीपासून चित्रकूट, बांदा, हमिरपूर, औरेया व जालौंन पर्यंत जाईल. त्यानंतर इटावामार्गे आग्रा-लखनौ मार्गाला जोडला जाईल. वाजपेयी यांच्या निधनानंतर योगी आदित्यनाथ यांनी वाजपेयी यांचे आग्रा, लखनौ, कानपूर, बलरामपूर येथे स्मारक करण्याची घोषणा केली होती.
छत्तीसगडच्या राजधानीचे नाव 'अटल नगर'
छत्तीसगडने आपल्या नव्या राजधानीला अटलजींचे नाव देण्याची काल घोषणा केली आहे. या राजधानीचे नाव आता 'अटलनगर' असे करण्यात येणार आहे.1998 साली अणूचाचणी यशस्वी करण्यामध्ये वाजपेयी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल 'छत्तीसगड आर्म्ड फोर्सेस' (सीएएफ) बटालियनला पोखरण बटालियन असे नाव देण्यात येणार आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. छत्तीसगडची नव्याने बांधलेली राजधानी नया रायपूरमध्ये वाजपेयी यांचा पुतळा उभा केला जाणार असून सर्व 27 जिल्ह्यांच्या मुख्यालयामध्ये अटलजींचा पुतळा व एका सेंट्रल पार्कची निर्मिती केली जाणार आहे अशी घोषणा रमणसिंह यांनी केली आहे. नया रायपूर हे मूळ रायपूरच्या आग्नेयेस 20 किमी अंतरावर आहे.
बिलासपूर विद्यापिठाला वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार असून राजनांदगाव येथे बांधण्यात येत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाला, जांगिर चम्पा जिल्ह्यातील मारवा औष्णिक प्रकल्प व रायपूरमध्ये बांधकाम सुरु असलेल्या एक्स्प्रेस मार्गालाही अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार आहे.