बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:55 IST2025-08-20T13:49:05+5:302025-08-20T13:55:51+5:30

Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: बेस्ट निवडणुकीत झालेल्या ठाकरे ब्रँडच्या पराभवानंतर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

sanjay raut first reaction after mns raj thackeray and uddhav thackeray group yuti defeat in best employees cooperative credit society election 2025 result | बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: मुंबईतील बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे गट-मनसे यांच्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत शशांक राव पॅनेलने सर्वाधिक १४ जागा जिंकून मोठे यश मिळवले. महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनेलने ७ जागांवर विजय मिळवला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लिटमस टेस्ट मानली जात होती. त्यामुळे एकही जागा निवडून न आलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीला या पराभवामुळे मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. 

हे आता बेस्टची पतपेढी चालवायला निघाले आहेत. म्हणजे लुटायला निघाले आहेत. काही करून मराठी माणसांच्या हातात संस्था राहू नयेत, यासाठी हे सगळे केले जात आहे. सातत्याने मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना प्रयत्न करू द्या. कुणालाही आणू द्या. बेस्ट पतपेढीची निवडणूक आम्ही एकत्र लढत आहोत. त्याचा नक्की परिणाम तुम्हाला दिसेल, असे संजय राऊत यांनी यापूर्वी म्हटले होते. परंतु, आता निकाल लागल्यानंतर याबाबत काहीच माहिती नाही. मी त्या विषयात नव्हतो, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. पत्रकारांनी संजय राऊत यांना बेस्ट निवडणुकीच्या निकालावर प्रश्न विचारले. परंतु, याची माहिती घेतलेली नाही, असे सांगून संजय राऊतांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले.

...तोपर्यंत मी या विषयावर बोलणार नाही

ती एका पतपेढीची निवडणूक आहे. याबाबत मला काहीच माहिती नाही. यासंदर्भात मी काही माहिती घेतली नाही. या स्थानिक निवडणुका असतात. मी याबाबत आधी माहिती घेईन आणि मग बोलेन. मी या विषयात फार लक्ष दिले नाही. या निवडणुकात ज्यांचे पॅनल असते, त्यांची ताकद काय यावर अवलंबून असते. माझ्याकडे पूर्ण माहिती नाही. ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही. जो पर्यंत माझ्याकडे या निकालाविषयी माहिती येत नाही, तोपर्यंत मी या विषयावर बोलणार नाही. पतपेढीची निवडणूक म्हणजे परीक्षा नाही. चाचणी नाही. लोक एकत्र आले निवडणुका लढल्या असतील. ज्या युनियनचे जास्त सदस्य असतात. तिथे बराच काळापासून शरद राव यांची संघटना आहे. शरद राव यांचे बहुमत महानगरपालिकेच्या यूनियनमध्ये असल्याची माझी माहिती आहे. मला माहिती नाही. त्यामुळे त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त होती. या निवडणुका पक्षीय बलावर लढल्या जात नाहीत. काही कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी ते केले असेल. यात कोणाला मोठे यश मिळाले आहे आणि मोठे अपयश हाती आले आहे, असे मला वाटत नाही, असे संजय राऊतांनी सांगितले.

दरम्यान,  शशांक राव यांचे पॅनल जिंकल्याचे मला कुणीतरी सांगितले. त्यांचे बहुमत तिथे पहिल्यापासून आहे. तुम्ही हा प्रश्न मला दिल्लीत विचारत आहात. हा प्रश्न मुंबईत ज्यांनी निवडणूक लढवली, त्यांना विचारायला हवा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

 

Web Title: sanjay raut first reaction after mns raj thackeray and uddhav thackeray group yuti defeat in best employees cooperative credit society election 2025 result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.