भरधाव ट्रेनमधून १४० मीटरपर्यंत उडाल्या ठिणग्या, भीतीचं वातावरण, मोठा अपघात टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 14:16 IST2026-01-13T14:16:29+5:302026-01-13T14:16:50+5:30
Samastipur Train Accident Averted: बिहारमधील समस्तीपूर जंक्शन येथे सोमवारी रात्री एक मोठा रेल्वे अपघात टळला. येथे जयनगर-हावडा ट्रेन भरधाव वेगात प्लॅटफॉर्मव दाखल होताच ट्रेनमधून १४० मीटरपर्यंत ठिणग्या उडताना दिसल्या. यावेळी एक छोटीशी चूक देखील मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारी ठरली असती.

भरधाव ट्रेनमधून १४० मीटरपर्यंत उडाल्या ठिणग्या, भीतीचं वातावरण, मोठा अपघात टळला
बिहारमधील समस्तीपूर जंक्शन येथे सोमवारी रात्री एक मोठा रेल्वे अपघात टळला. येथे जयनगर-हावडा ट्रेन भरधाव वेगात प्लॅटफॉर्मव दाखल होताच ट्रेनमधून १४० मीटरपर्यंत ठिणग्या उडताना दिसल्या. यावेळी एक छोटीशी चूक देखील मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारी ठरली असती. सुदैवाने वेळीच ट्रेन थांबवण्यात यश आले आणि मोठा अपघात टळून प्रवाशांचे प्राण वाचले.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार समस्तीपूर रेल्वे जंक्शनवर सोमवारी रात्री हा अपघात थोडक्यात टळला. १२ जानेवारी रोजी रात्री सुमारे १० वाजून ५४ मिनिटांनी ट्रेन क्रमांक १३०३२ जयनगर-हावडा एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक ०३ वर पोहोचली. याच दरम्यान, प्लॅटफॉर्मवर वॉटरिंगच्या कामासाठी ठेवलेला हायड्रेंट पाईप तसाच ठेवलेला होता. तो घरंगळत जाऊन ट्रेनच्या लोकोपासून दहाव्या दहाव्या डब्याकडे जाऊन अडकला.
हा पाईप प्लॅटफॉर्म आणि डब्याच्या मध्ये जाऊन अडकला, तसेच सुमारे १४० मीटरपर्यंत ट्रेनसोबत घासत गेला. यादरम्यान, घर्षणामुळे ठिणग्या उडत होत्या. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरील कोपिंग टाईल्सचे नुकसान झाले. तसेच प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. या घटनेची माहिती मिळताच स्टेशन व्यवस्थापक आणि तांत्रिक विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर गॅस कटरच्या मदतीने हा पाईप कापण्यात आला. तसेच डब्यांची तपासणी करून रात्री १२ वाजून ३५ मिनिटांनी ट्रेन पुढे रवाना करण्यात आली.