दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 23:16 IST2025-12-05T23:12:32+5:302025-12-05T23:16:29+5:30
Putin India Tour Completed: दोन दिवसांचा दौरा सुफल संपूर्ण करून रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन परत जाण्यासाठी दिल्लीहून रवाना झाले.

दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
Putin India Tour Completed: २३ व्या भारत-रशिया शिखर परिषदेसाठी भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन मायदेशी परतले आहेत. दोन दिवसीय दौऱ्यासाठी पुतिन भारतात आले होते. गुरुवारी सायंकाळी सगळे प्रोटोकॉल बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पालम विमानतळावर जाऊन पुतिन यांचे सहर्ष स्वागत केले. यानंतर शुक्रवारी सकाळपासून विविध कार्यक्रमांमध्ये पुतिन सहभागी झाले. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवरांसोबत पुतिन आणि रशियाच्या प्रतिनिधी मंडळाचे स्नेहभोजन झाले. यानंतर पुतिन मायदेशात जाण्यासाठी रवाना झाले.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या पुतिन यांच्या भारत दौऱ्याकडे जगाचे लक्ष लागले होते. टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत-अमेरिका संबंधात आलेला तणाव आणि अमेरिकेने रशियाच्या तेलआयातीवर निर्बंध घालून भारताची केलेली कोंडी या पार्श्वभूमीवर पुतिन यांचा भारत दौरा विशेष आणि महत्त्वाचा मानला जात होता. शुक्रवारी दोन्ही देशांमध्ये अनेक क्षेत्रात मोठे आणि महत्त्वाचे करार झाले. पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा संपन्न झाली. पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान झालेल्या करारांमध्ये कामगार स्थलांतर, आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, अन्न सुरक्षा, जहाजबांधणी, रसायने आणि खते यांचा समावेश होता.
भारत-रशिया धोरणात्मक भागीदारीचा २५ वा वर्धापन दिन
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांचे स्वागत केले. भारत-रशिया धोरणात्मक भागीदारीचा २५ वा वर्धापन दिन साजरा करत असताना आजचा दिवस आपल्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. भारत-रशिया भागीदारी शांतता, स्थिरता आणि परस्पर सामाजिक-आर्थिक आणि तांत्रिक प्रगतीसाठी सामायिक वचनबद्धतेवर आधारित आहे. २०२५ हे वर्ष आमच्या बहुआयामी संबंधांसाठी अत्यंत यशस्वी वर्ष राहिले आहे. २३ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत जारी केलेले संयुक्त निवेदन दोन्ही देशांतील विशेष द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी एक व्यापक पथदर्शी ठरले आहे, असे द्रौपदी मुर्मू यांनी नमूद केले.
दोन्ही देशांच्या संस्कृतींमधील संवाद शतकानुशतके जुना
आपल्या संस्कृतींमधील संवाद शतकानुशतके जुना आहे. रशियन प्रवाशांची भारतातील भेट, भारतीय व्यापाऱ्यांच्या रशिया भेटी, महात्मा गांधी आणि लिओ टॉल्स्टॉय यांच्यातील प्रेरणादायी पत्रव्यवहार आणि एकमेकांच्या समृद्ध सांस्कृतिक, साहित्यिक आणि कलात्मक वारशात खोलवर असलेला रस याने अधिक अधोरेखित होतो. मला खात्री आहे की, आजच्या स्नेहभोजनादरम्यान रशियन मित्र या सामायिक सांस्कृतिक वारशाचे काही परिचित स्वाद आणि सुर ओळखतील. गंगा आणि व्होल्गाचा संगम आपल्या मैत्रीतून वाहतो. तो आपल्या सहकार्याचे मार्गदर्शन करत राहील. आजची सायंकाळ दोन्ही देशांमधील मैत्रीचा उत्सव आहे, जी अनेक वर्षांपासून अखंड आहे आणि येणाऱ्या काळात अधिक मजबूत होत राहील, असा विश्वास द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.
पुतिन यांनी मानले पंतप्रधान मोदींचे विशेष आभार
रशियन प्रतिनिधी मंडळाचे आदरातिथ्यपूर्ण स्वागत केल्याबद्दल भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, भारताच्या पंतप्रधान आणि आमच्या सर्व भारतीय सहकाऱ्यांचे आभार मानतो. राज कपूरच्या काळापासूनचा भारत खूप बदलला आहे. परंतु एक गोष्ट अजूनही अपरिवर्तनीय आहे, ती म्हणजे मैत्री आणि सहकार्यासाठी सामायिक वचनबद्धता, असे पुतिन यांनी नमूद केले. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे पुतिन यांना निरोप देण्यासाठी विमानतळावर गेले होते.
#WATCH | Delhi: Russian President Vladimir Putin leaves from Delhi after concluding his 2-day State visit to India
EAM Dr S Jaishankar sees him off at the airport pic.twitter.com/KR2vRfSMLg— ANI (@ANI) December 5, 2025