रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 06:16 IST2025-12-06T06:15:20+5:302025-12-06T06:16:35+5:30
एका भेटीत दोन ‘तीर’- अमेरिकेला शह : ट्रम्पच्या धमक्यांना न जुमानता भारत-रशिया मैत्री घट्ट, अनेक करार : आरोग्य, स्थलांतर, वैद्यकीय शिक्षण, रोजगार, खत उद्योग आदींसाठी महत्त्वाचे करार केले.

रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
नवी दिल्ली : अमेरिकेने टॅरिफच्या माध्यमातून लावलेला दंड आणि तेलआयातीवरच्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भारत आणि रशियाने आर्थिक व व्यापार सहकार्याला अधिक बळकटी देण्यासाठी २०३० पर्यंत ५ वर्षांचा आराखडा निश्चित केला. त्याच वेळी युक्रेन युद्ध संवादाच्या माध्यमातून लवकर संपुष्टात आणावे, अशीही भूमिका भारतानेरशियापुढे व्यक्त केली.
शुक्रवारी हैदराबाद हाउस येथे भारत-रशियादरम्यानची २३ वी शिखर परिषद अत्यंत मोकळेपणाने पार पडली. या शिखर परिषदेत आरोग्य, स्थलांतर, वैद्यकीय शिक्षण, अन्न सुरक्षा नियम, ध्रुवीय जहाज वाहतूक, मेरिटाइम सहकार्य, खत उद्योग यावर महत्त्वाचे करार झाले.
या शिखर परिषदेचा उद्देश उभय देशांत संरक्षण, आर्थिक सहकार्य आणि ऊर्जा क्षेत्रात अधिक मजबूत करण्याचा होता. या शिखर परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी उभय देशातील आठ दशके सुरू असलेल्या सहकार्याला नवी गती देण्याची इच्छा व्यक्त केली.
या परिषदेत भारत रशियामध्ये आपला नवा दुतावास सुरू करण्याचेही संकेत देण्यात आले. या शिखर परिषदेनंतर प्रसार माध्यमांना दिलेल्या निवेदनात दोन्ही देशांच्या प्रमुखांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले...
मैत्री : आठ दशकांत जगाने अनेक चढउतार पाहिले आहेत. पण भारत-रशिया मैत्री ध्रुवताऱ्याप्रमाणे स्थिर राहिली.
सहकार्य : भारत-रशिया आर्थिक सहकार्याला नव्या उंचीवर घेऊन जाणे याला आमचे प्राधान्य राहील.
शांतता : दहशतवादाचा धोका दोन्ही देशांना आहे. पहलगाम हल्ला असो वा क्रोकस शहरावरचा हल्ला असो, भारत हा नेहमीच शांततेच्या बाजूने उभा राहिला आहे. भारत-रशिया खांद्याला खांदा लावून दहशतवादाविरुद्ध उभे आहेत.
व्यापार : युरेशियन इकॉनॉमिक युनियनसोबतच्या मुक्त व्यापार करारावर लवकर सहमती होईल.
खनिजे : दुर्मीळ व महत्त्वाची खनिजांच्या व्यापाराबाबत भारत-रशियातील सहकार्य सुरक्षित आहे.
कौशल्य : व्यावसायिक शिक्षण, कौशल्य विकास व प्रशिक्षण यावर उभय देशांत आदान-प्रदान होईल.
व्लादिमीर पुतीन म्हणाले...
संकल्प : भारत-रशियाने सुरक्षा, अर्थव्यवस्था, व्यापार आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये सहकार्याला प्राधान्य देण्याचा संकल्प केला आहे.
लक्ष्य : भारत-रशिया वार्षिक व्यापाराचे उद्दिष्ट्य १०० अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे.
इंधन : रशिया भारतासोबत ऊर्जा क्षेत्रातही सहकार्य वाढवण्याचा विचार करत असून भारताला इंधनाचा अखंड पुरवठा रशियाकडून केला जाईल.
चर्चा : लहान मॉड्युलर अणुभट्ट्या व फ्लोटिंग अणुप्रकल्प निर्मितीबाबत चर्चा सुरूच राहतील.
न्याय : रशिया, भारत आणि आमच्यासारखे इतर समान विचारसरणीचे देश न्याय्य आणि बहुध्रुवीय जगाच्या भल्यासाठी काम करत आहोत.
‘दूरदृष्टीचा नेता’
मोदी म्हणाले, २००१मध्ये सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपण भारत दौऱ्यावर आला होता. याला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या दौऱ्यात जो भारत-रशिया संबंधांचा पाया रचला होता तो आजही मजबूत आहे. यातून एक नेता दूरदृष्टी कशी ठेवतो याचा प्रत्यय येतो.
‘अखंड तेलपुरवठा करू’
अमेरिकेने रशियाकडून तेल घेण्यासंदर्भात भारतावर निर्बंध घातले असताना रशियाने मात्र शुक्रवारी भारताला आमच्याकडून अखंड तेलपुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले.
अमेरिकेच्या निर्बंधांचा फटका दोन्ही देशांनाही बसला आहे. या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी भारताला मदतीचा हात देत अमेरिकेला शह दिला आहे.
‘मोदी यांच्या आवडत्या योजनेला मदत करू’
मोदींसोबत अनेकदा फोनवर महत्त्वाच्या विषयावर चर्चा होते. भारत-रशिया संबंध मजबूत आहेत त्याचबरोबर आमचे परस्पर संबंध अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांसह अनेक ठिकाणी बळकट होत आहेत. आमच्यातील व्यापार रुबल- रुपयामध्ये होत आहे. आम्ही मोदींना सर्वात आवडणाऱ्या ‘मेक इन इंडिया’ला मदत करू.