भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 07:57 IST2025-10-06T07:53:30+5:302025-10-06T07:57:20+5:30
रशिया पाकिस्तान या डीलवर अधिकृत विधाने नाहीत मात्र पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना रशियाकडून इंजिनाचा पुरवठा केल्याच्या वृत्तानंतर काँग्रेसनं केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
नवी दिल्ली - पाकिस्तानच्या JF 17 थंडर फायटर जेटला रशिया RD 93MA इंजिन देणार असल्याच्या बातमीनं भारतात खळबळ माजली आहे. विरोधकांनी या मुद्द्यांवरून केंद्र सरकारला घेरले आहे. मात्र पाकिस्तानला हे इंजिन विकल्याचा फायदा भारतालाच होणार आहे असा दावा रशियाच्या संरक्षण तज्ज्ञांनी केला आहे.
रशियाचे प्रिमाकोव इन्स्टिट्यूटचे साऊथ अँन्ड साऊथ ईस्ट आशिया विभागाचे प्रमुख प्योटर टॉपीचकनोव म्हणाले की, विरोधकांकडून भारत सरकारला टार्गेट करणे मला योग्य वाटत नाही. जर रशियाकडून पाकिस्तानला JF 17 फायटर जेटला इंजिन देण्याची बातमी खरी असेल तर त्याचा भारताला २ प्रकारे फायदा होणार आहे. यातून चीन आणि पाकिस्तान अद्याप रशियाच्या इंजिनाला पर्याय बनवू शकले नाहीत हे पहिल्यांदा दिसून येते. दुसरं म्हणजे नव्या विमानाचं इंजिन भारतासाठी फॅमिलियर असेल, विशेषत: भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये JF 17 चा वापर पाहिला होता. चीनने रशियाकडून FC 17 जेटसाठी आरडी ९३ इंजिन मागितले होते आणि पाकिस्तानला हे इंजिन पोहचवणार असल्याची शक्यता अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान कार्यकाळात उल्लेख केला गेला होता असं त्यांनी सांगितले.
तर आणखी एका एक्सपर्टनं नाव न सांगण्याच्या अटीवर या चर्चेवर भाष्य केले आहे. आरडी ९३ इंजिनाची पाकिस्तानसोबत डील ही व्यावसायिक आहे. त्यात कुठलेही तांत्रिक हस्तांतरण नाही असा विश्वास रशियाने भारताला दिला आहे. तर भारताकडे तांत्रिक हस्तांतरणासह उत्तम आरडी ३३ इंजिनचं लायसन्स देण्यात आले आहे. आरडी ९३ इंजिन मूळ आरडी ३३ पेक्षा जास्त थ्रस्ट निर्माण करते परंतु त्याची सर्व्हिस लाईफ कमी आहे. आरडी ९३ चे सर्व्हिस लाईफ २,२०० तास आहे तर आरडी-३३ चे ४,००० तास आहे.
मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, रशिया पाकिस्तान या डीलवर अधिकृत विधाने नाहीत मात्र पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना रशियाकडून इंजिनाचा पुरवठा केल्याच्या वृत्तानंतर काँग्रेसनं केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. हे मोदी सरकारच्या राजनैतिकतेचे अपयश आहे आणि त्यांनी देशाला हे सांगायला हवे की भारताचा विश्वासू भागीदार रशिया पाकिस्तानला लष्करी मदत का देत आहे? असा प्रश्न काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी विचारला आहे.