सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 15:58 IST2025-10-06T15:56:58+5:302025-10-06T15:58:43+5:30
Lawyer Creates Ruckus In CJI Court: सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान एका वकिलाने प्रचंड गोंधळ घातला.

सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
Ruckus In CJI Court: सर्वोच्च न्यायालयात सोमवारी(दि.6) एक धक्कादायक घटना घडली. सरन्यायाधीश बी. आर. गवई (CJI B.R. Gavai) यांच्या खंडपीठासमोर सुनावणीदरम्यान एका वकिलाने अचानक गोंधळ घातला. संतापाच्या भरात त्या वकिलाने आपला बूट काढून सीजेआयकडे फेकण्याचा प्रयत्न केला. यानंतर सुरक्षा रक्षकांनी तत्काळ कारवाई करत त्या वकिलाला ताब्यात घेतले.
ही घटना न्यायालयाच्या प्रतिष्ठेला ठेस पोहोचवणारी मानली जात आहे. त्या वकिलावर न्यायालयाचा अवमानाचा (Contempt of Court) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची पूर्ण शक्यता आहे.
These things do not affect me: CJI BR Gavai after lawyer attempts to attack him in Supreme Court
— Bar and Bench (@barandbench) October 6, 2025
Read more: https://t.co/kcIjGf5S82pic.twitter.com/OtixUNh2PR
कोणत्या कलमांखाली होऊ शकते कारवाई?
जो कोणी कोर्टची मर्यादा तोडतो, अपमानास्पद वर्तन करतो किंवा न्यायिक प्रक्रियेत अडथळा आणतो, त्याच्यावर थेट कारवाई करता येते. अशा घटनांसाठी Contempt of Courts Act, 1971 अंतर्गत कारवाई केली जाते. संविधानातील कलम 129 नुसार सुप्रीम कोर्टला स्वतःच्या अवमानाशी संबंधित प्रकरणांमध्ये थेट कार्यवाही करण्याचा अधिकार आहे.
किती होऊ शकते शिक्षा?
जर कोणी न्यायालयात गोंधळ घातला, न्यायाधीशाशी उद्धटपणे वागले किंवा बूट काढून फेकण्यासारखी कृती केली, तर ती कृती क्रिमिनल कंटेम्प्ट (गुन्हेगारी अवमान) म्हणून गणली जाते. अशा प्रकरणांत न्यायालय दोषी व्यक्तीला जास्तीत जास्त 6 महिन्यांपर्यंत साधी कैद, 2000 रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा देऊ शकते.
मात्र, कायद्यात एक सवलतीची तरतूद आहे. जर आरोपीने स्वतःची चूक मान्य करुन मनापासून माफी मागितली आणि न्यायालयाला त्याचा पश्चात्ताप खरा वाटला, तर शिक्षा कमी किंवा माफही केली जाऊ शकते. पण जर न्यायालयाला वाटले की, माफी केवळ दिखावा आहे, तर शिक्षा दिली जाते.