"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 11:23 IST2025-10-02T11:23:07+5:302025-10-02T11:23:38+5:30
RSS Vijayadashami utsav 2025 : "आपल्याकडे नेशन स्टेटची कल्पना नाही. आपली संस्कृतीच राष्ट्र घडवते. राज्य येत असतात जात असतात. राष्ट्र सातत्याने विद्यमान राहिले आहे. सनातन काळापासून आतापर्यंत हे आमचे प्राचित हिंदूराष्ट्र आहे. या अर्थाने हिंदूराष्ट्र आहे."

"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
RSS 100 Years : आम्ही सर्वप्रकारचे चढ उतार बघितले. गुलामीही बघितली आणि स्वातंत्र्यही बघितली. आम्ही सदैव विद्यमान आहोत. यामुळेच हिंदू समाजाचे बलसंपन्न होणे, शिलसंपन्न होणे आणि संघटित होणे, या देशाची एकता, एक्त्मता, सुरक्षा आणि विकासाची गॅरंटी आहे. कारण हिंदू समाज सनातन काळापासून येथे विद्यमान आहे. तो या देशाचा उत्तरदायी समाज आहे. असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ते नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजया दशमी उत्सवात बोलत होते.
भागवत म्हणाले, "कुणाला हिंदू शब्दाची समस्या असेल, त्याने हिंदवी म्हणाले, भारतीय म्हणावे, आर्य म्हणावे. हे सर्व समानार्थी शब्द आहेत. मात्र या राष्ट्रियत्वाचा स्पष्ट स्वरूपात निर्देशित करणारा एकच शब्द आपल्याला सापडतो, तो म्हणजे 'हिंदू'. आपले राष्ट्र राज्यांवर आधारलेले नाही. आपल्याकडे नेशन स्टेटची कल्पना नाही. आपली संस्कृतीच राष्ट्र घडवते. राज्य येत असतात जात असतात. राष्ट्र सातत्याने विद्यमान राहिले आहे. सनातन काळापासून आतापर्यंत हे आमचे प्राचित हिंदूराष्ट्र आहे. या अर्थाने हिंदूराष्ट्र आहे."
भागवत पुढे म्हणाले, "सुदैवाने, या संस्कृतीमुळे आणि धर्मामुळे, माणसांमध्ये विभाजन करणारी, 'आम्ही आणि ते', या मानसिकतेपासून, हा समाज पूर्णपणे मुक्त होता, मुक्त आहे आणि मुक्त राहील. 'वसुधैव कुटुंबकम'चा पुरस्करता आणि संरक्षक हाच समाज राहिला आहे. यामुळेच, या देशाला जगाच्या विकासात आपले अपेक्षित आणि योग्य योगदान देणारा देश बनवणे हे हिंदू समाजाचे कर्तव्य ठरते. त्याच्या संघटित कार्यशक्तीने जगाला नवी दिशा देऊ शकणाऱ्या धर्माचे संरक्षण करत, भारताला वैभव संपन्न करण्याचे काम, संकल्प घेऊन गेल्या 100 वर्षांपासून करत आहे, संपूर्ण हिंदू समाजाला संघटित करत आहे."
"एकदा समाज संघटित झाला की, ही सर्व कामे दुसऱ्या कुणाला करावी लागत नाहीत. नेत्यांना, पक्षांना, सरकारांना करावे लागत नाहीत. अवतारांनाही येण्याची आवश्यकता भासत नाही. समाज सर्व कामे स्वबळावर करतो. यासाठी, असा समाज बनवण्यासाठी व्यक्तीकत आणि राष्ट्रीय चारित्र्याचे निर्माण ह्वायला हवे. संघाच्या शाखेत, आपल्या राष्ट्र स्वरुपाची स्पष्ट कल्पना आणि गोरव प्राप्त होतो. महत्वाचे म्हणजे, कतृत्व, नेतृत्व, व्यक्तीत्व, समजदारी आणि भक्ती, हेही शाखेतील संस्कारांतूनच प्राप्त होते," असेही भागवत म्हणाले.