भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 08:50 IST2025-11-19T08:50:23+5:302025-11-19T08:50:59+5:30
RSS Mohan Bhagwat on Hindu Bharat: "हिंदू धर्म हा केवळ धार्मिक शब्द नाही, ही एक सभ्यतेची ओळख आहे"

भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
RSS Mohan Bhagwat on Hindu Bharat: ज्या व्यक्तीला भारताचा अभिमान वाटतो, ती प्रत्येक व्यक्ती हिंदूच आहे. हिंदू धर्माची ओळख केवळ धार्मिक नसून ती एक सभ्यतेची ओळख आहे. भारत आणि हिंदू एकच आहेत. भारत मूळतः 'हिंदू राष्ट्र'च आहे. त्यामुळे भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची वेगळी गरज नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले. गुवाहाटी येथे एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
भारताची सभ्यता हे हिंदू राष्ट्राची ओळख
मोहन भागवत म्हणाले, "भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची गरज नाही. भारताच्या संस्कृतीतून आधीच हिंदू राष्ट्राचे प्रतिबिंब दिसते. हिंदू धर्म हा केवळ एक धार्मिक शब्द नाही तर हजारो वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेत रुजलेली एक सभ्यतेची ओळख आहे. भारत आणि हिंदू हे समानार्थी आहेत. भारताला 'हिंदू राष्ट्र' होण्यासाठी कोणत्याही अधिकृत घोषणेची आवश्यकता नाही. भारताची सभ्यता हेच त्याचे प्रमाण आहे."
संघ म्हणजे काय? भागवत म्हणतात...
"संघाची स्थापना कोणाचाही विरोध करण्यासाठी किंवा हानी पोहोचवण्यासाठी झाली नाही, तर प्रत्येकाच्या स्वयंशिस्तीसाठी आणि चारित्र्य निर्माणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी झाली. भारताला जगात आघाडीवर नेण्याच्या उद्देशाने संघ कार्यरत आहे. भारताला 'वर्ल्ड लीडर' बनवण्यात योगदान देण्यासाठी संघाची कार्यशैली सुरू आहे. विविधतेत भारताला एकत्र आणण्याची पद्धत म्हणजे संघ (RSS)," असेही भागवत यांनी रोखठोकपणे सांगितले.
घुसखोरीबाबत व्यक्त केली चिंता
आसाममधील लोकसंख्या बदलांबद्दलच्या चिंता दूर करण्यासाठी मोहन भागवत यांनी आत्मविश्वास, दक्षता आणि स्वतःच्या भूमी आणि ओळखीबद्दल दृढ आसक्ती बाळगण्याचे आवाहन केले. त्यांनी बेकायदेशीर स्थलांतर, हिंदूंसाठी तीन मुलांचा आदर्श यासह संतुलित लोकसंख्या धोरणाची आवश्यकता आणि फुटीर धार्मिक धर्मांतरांना विरोध करण्याचे महत्त्व यासारख्या मुद्द्यांवर भाष्य केले. आपण आत्मविश्वास ठेवण्यासोबत दक्षता बाळगली पाहिजे. तसेच आपली जमीन आणि संस्कृती याच्याशी आसक्ती राखली पाहिजे असे ते म्हणाले. समाजातील सर्व घटकांनी निःस्वार्थपणे एकत्र काम केले पाहिजे, तरच या घुसखोरीला आळा बसेल, असेही ते म्हणाले.