VIDEO: 'मागे या, अजून खाली येत आहेत'; अरुणाचलमध्ये वाहनांवर कोसळले दगड, प्रवासी दहशतीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:17 IST2025-08-26T15:16:29+5:302025-08-26T15:17:01+5:30

अरुणाचल प्रदेशमध्ये दिरंग-तवांग रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

Road connectivity cut off due to a massive landslide near the Sapper Camp in West Kameng district of Arunachal Pradesh | VIDEO: 'मागे या, अजून खाली येत आहेत'; अरुणाचलमध्ये वाहनांवर कोसळले दगड, प्रवासी दहशतीत

VIDEO: 'मागे या, अजून खाली येत आहेत'; अरुणाचलमध्ये वाहनांवर कोसळले दगड, प्रवासी दहशतीत

Arunachal Pradesh Landslide: देशभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. उत्तरेकडील पर्वतीय भागात पावसामुळे भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील झाली आहे. तर मोठ्या प्रमाणात आलेल्या मातीच्या ठिगाऱ्यांमध्ये अनेक ठिकाणं दबली गेली आहेत. रस्त्ये खलच्याने काही ठिकाणींचा संपर्क देखील तुटला आहे. अरुणाचल प्रदेशातही भूस्खलन झाल्याने मोठं नुकसान झालं आहे. डोंगरावरुन मोठ्या प्रमाणात दगड खाली आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अरुणाचल प्रदेशातील तवांगमधील दिरंग-तवांग रस्त्यावर अचानक भूस्खलन झाले. डोंगरावरून मोठे मोठे दगड पडू लागल्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांना त्याचा फटका बसला. या घटनेमुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होता. सुदैवाने कोणताही दगड प्रवाशावर पडला नाही, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली. भूस्खलनामुळे दिरंग-तवांग रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. या घटनेनंतर पश्चिम कामेंग जिल्ह्यात अनेक प्रवासी तिथे अडकले आहेत. वाहतूक पूर्ववत व्हावी यासाठी रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आलं आहे.

सोमवारी दुपारी अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील सॅपर कॅम्पजवळ झालेल्या मोठ्या भूस्खलनामुळे दिरांग आणि तवांगमधील रस्ता संपर्क तुटला. पद्मा हॉटेलजवळ झालेल्या भूस्खलनामुळे वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये घटनास्थळी गोंधळाचे वातावरण होते. डोंगरावरून दगड कोसळत होते आणि लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावत होते. दरड कोसळल्याने सुमारे १२० मीटर रस्ता बंद झाला.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती, बॅक मारो बॅक मारो, काहीतरी येत आहे असं ओरडतो. तर दुसरी व्यक्ती लवकर मागे ये अजून दगड खाली येतील इथून निघून जा, असं म्हणत आहे. व्हिडिओमध्ये, काही लोक हॉर्न वाजवत आहेत आणि त्यांची वाहने वेगाने मागे येत आहेत. काही लोक वाहनांमधून उतरत होते आणि पळत होते. व्हिडिओमध्ये काही दगड वाहनांवर आदळल्याचे दिसत आहे.

सुदैवाने या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाच्या मते, दुरुस्तीचे काम सुरू असून बुधवारपर्यंत वाहतूक पूर्ववत होऊ शकते. सध्या प्रवाशांना या मार्गाचा वापर प्रवासासाठी करू नये असं सांगण्यात आलं आहे.
 

Web Title: Road connectivity cut off due to a massive landslide near the Sapper Camp in West Kameng district of Arunachal Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.