हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 13:29 IST2025-11-04T13:29:14+5:302025-11-04T13:29:51+5:30
मुलींचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
हैदराबाद-विजापूर महामार्गावर एका बसने खडी भरलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात तनुषा, साईप्रिया आणि नंदिनी या तीन बहिणींसह १९ जणांचा मृत्यू झाला. या तिन्ही बहिणी हैदराबादमध्ये शिकत होत्या आणि एका लग्नाला उपस्थित राहण्यासाठी तंदूर येथे आल्या होत्या. अपघातानंतर त्यांचे मृतदेह चेवेल्ला येथील सरकारी रुग्णालयात आणण्यात आले, जिथे त्यांच्या आई-वडिलांनी टाहो फोडला.
भीषण अपघातात तिन्ही मुलींचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मुलींचे मृतदेह पाहून त्यांची आई अंबिका बेशुद्ध पडली. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिन्ही बहिणी हैदराबादमध्ये शिक्षण घेत होत्या आणि लग्नाला उपस्थित राहण्यासाठी तंदूर येथे आल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच मोठ्या मुलीचं लग्न झालं होतं. त्यानंतर आता आणखी एका लग्नासाठी सर्व मुली घरी आल्या होत्या.
शोकाकुल वडिलांनी सांगितलं की, "मी मुलींना येण्यासाठी मनाई केली होती, पण त्यांच्या आईने त्यांना येथे बोलावलं. त्यांना त्याच रात्री परत देखील जायचं होतं, पण आम्ही त्यांना सोमवारी सकाळी निघण्यास सांगितलं. जेव्हा मुलींना बस स्टॉपवर सोडण्यात आलं तेव्हा कोणीतरी बस बरोबर नाही असं सांगितलं होतं. पण तरीही आम्ही त्यांना त्याच बसने पाठवले. माझ्या तीन मुली गेल्या, आता मी काय करू?"
सैप्रिया ही बीएससीची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी होती, नंदिनी बीकॉमची प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती आणि तनुषा पदवीधर झाल्यानंतर नोकरी करत होती. तिन्ही बहिणी हुशार मुली होत्या आणि कुटुंबीयांना त्यांचा खूप अभिमान वाटत होता. या घटनेने हसतं खेळतं घर उद्ध्वस्त! झालं आहे. सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.