महिला खासदारासोबत रिंकू सिंहचा साखरपुडा झाला?; प्रिया सरोजच्या वडिलांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 18:23 IST2025-01-17T18:22:43+5:302025-01-17T18:23:20+5:30
प्रिया सरोज यांनी दिल्ली विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले असून वयाच्या २५ व्या देशातील सर्वात युवा खासदार त्या बनल्या आहेत.

महिला खासदारासोबत रिंकू सिंहचा साखरपुडा झाला?; प्रिया सरोजच्या वडिलांचा खुलासा
नवी दिल्ली - देशातील युवा महिला खासदार प्रिया सरोज आणि भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंहचा साखरपुडा झाल्याची बातमी माध्यमात झळकली परंतु त्यामागचं सत्य वेगळेच आहे. रिंकू आणि प्रिया दोघेही सध्या घरी नाहीत त्यामुळे साखरपुड्याचा विषयच येत नाही असं प्रिया सरोज यांच्या वडिलांनी खुलासा केला. परंतु दोघांच्या लग्नाबाबतीत विचार सुरू आहे. प्रियाच्या कुटुंबातील लोक रिंकूच्या घरी गेले होते परंतु दोघांचा साखरपुडा झाला नाही. प्रिया सरोज सध्या तिरुवनंतपुरमला आहे आणि रिंकू इंग्लडविरोधातील टी-२० सामन्याची तयारी करत आहे.
प्रिया सरोज यांचे वडील तुफानी सरोज म्हणाले की, मुलीच्या लग्नाचा विषय आहे त्यामुळे विचार करूनच निर्णय घ्यावा लागेल. रिंकू आणि सरोज यांच्या लग्नाची बोलणी सुरू आहेत मात्र अद्याप काही ठरलं नाही, साखरपुडा झाला नाही असं त्यांनी सांगितले. प्रिया सरोज या मछली शहर जागेवरून खासदार म्हणून निवडून आल्यात. त्या समाजवादी पक्षाच्या नेत्या असून तीनदा खासदार बनलेल्या तुफानी सरोज यांच्या कन्या आहेत. तुफानी सरोज हे १९९९ ला सैदपूर, २००४ साली गाजीपूर, २००९ साली मछली शहरातून खासदार बनले होते. २०१६ साली त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
प्रिया सरोज सुप्रीम कोर्टात वकील म्हणून काम करत होत्या. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले असून वयाच्या २५ व्या देशातील सर्वात युवा खासदार त्या बनल्या आहेत. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षातून त्यांनी मछली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली आणि भारतीय जनता पार्टीचे बीपी सरोज यांचा पराभव केला. दुसरीकडे रिंकू सिंह यांचं जीवन संघर्षातून पुढे आले आहे. संकटाचा सामना करत रिंकूने भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवले. रिंकूचे वडील गॅस सिलेंडरची डिलीवरी करायचे मात्र रिंकूने आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी करत प्रसिद्धीझोतात आला. त्यानंतर भारतीय क्रिकेट टीममध्ये संधी मिळताच त्याने स्वत:ला सिद्ध करून दाखवले.
रिकू सिंग एक अप्रतिम मॅच फिनिशर
रिंकू सिंग भारतीय संघातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये त्याची कामगिरी अप्रतिम राहिली आहे. रिंकू सिंगने टीम इंडियासाठी ३० टी२० सामन्यांमध्ये ४६ पेक्षा जास्त सरासरीने ५०७ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेटही १६० पेक्षा जास्त आहे. रिंकूने टीम इंडियासाठी २ वनडे सामनेही खेळले आहेत. याशिवाय रिंकू सिंग हा आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचा महत्त्वाचा भाग आहे. रिंकू सिंगला IPL 2025 साठी कोलकाता नाईट रायडर्सने कायम ठेवले आहे. रिंकू सिंगला या मोसमासाठी १३ कोटी रुपये मिळणार आहेत.