देशातील सर्वात श्रीमंत IPS अधिकारी; मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त संपत्ती, कुठून आला एवढा पैसा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 15:29 IST2024-04-09T15:28:25+5:302024-04-09T15:29:17+5:30
Richest IPS officer in India: 2004 बॅचचे आयपीएस अधिकारी गुरप्रीत सिंग भुल्लर देशातील सर्वात श्रीमंत IPS अधिकारी आहेत.

देशातील सर्वात श्रीमंत IPS अधिकारी; मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त संपत्ती, कुठून आला एवढा पैसा?
Richest IPS officer in India: देशात अनेक IAS-IPS अधिकारी आहेत, ज्यांची संपत्ती लाखो-करोडोंमध्ये आहे. पण, पंजाब केडरचे IPS गुरप्रीतसिंग भुल्लर हे देशातील सर्वात श्रीमंत IPS अधिकारी आहेत. 2016 मध्ये ते आपल्या संपत्तीची घोषणा करुन प्रकाशझोतात आले होते. विशेष म्हणजे, त्यावेळी त्यांची संपत्ती माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सुखबीर सिंग बादल यांच्यापेक्षाही खूप जास्त होती. अशातच एका सरकारी कर्मचाऱ्याकडे इतका पैसा कुठून आला, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला तर मग जाणून घेऊ...
आयपीएस गुरप्रीत सिंग भुल्लर (IPS Gurpreet Singh Bhullar) यांनी आयजी (IG) पदावर पदोन्नती होण्यापूर्वी लुधियानाचे पोलिस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. याशिवाय, अनेक वर्षे ते मोहालीचे एसएसपी होते. त्यांनी 2009 ते 2013 आणि 2015 ते ऑगस्ट 2016, या काळात मोहालीचे एसएसपी पद सांभाळले.
आजोबाही आयपीएस अधिकारी...
गुरप्रीतसिंग भुल्लर हे 2004 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी बीए ऑनर्स पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर युपीएससी परीक्षा देऊन भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. विशेष म्हणजे, त्यांचे आजोबा गुरदियालसिंग भुल्लर हेदेखील आयपीएस अधिकारी होते. गुरदियाल सिंग भुल्लर हे 1957 ते 1960 दरम्यान जालंधरचे एसएसपी होते.
एवढी संपत्ती...
IPS गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी 2016 मध्ये 152 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. संपत्ती जाहीर करताना त्यांनी आठ घरे, चार ठिकाणी शेती आणि तीन व्यावसायिक भूखंड असल्याचे सांगितले. याशिवाय, त्यांच्याकडे 85 लाख रुपयांची व्यावसायिक मालमत्ता आणि सैनिक फार्म, दिल्ली येथे 1500 स्क्वेअर यार्डचा भूखंडदेखील आहे. तसेच, मोहालीतील एका गावात त्यांची 45 कोटी रुपयांची जमीन असल्याचेही त्यांनी सांगितले.
वारसा मिळालेली मालमत्ता
त्यांनी सरकारकडे नमुद केल्यानुसार, त्यांच्याकडे असलेली बहुतांश मालमत्ता वारशाने मिळालेली आहे. ही सर्व मालमत्ता त्यांना आजी-आजोबांकडून मिळाल्याचा उल्लेख कागदपत्रांमध्ये आहे. विशेष म्हणजे, पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांची एकूण संपत्ती 48 कोटी रुपये, तर सुखबीरसिंग बादल यांची एकूण संपत्ती 102 कोटी रुपये होती. या दोन्ही मुख्यमंत्र्यांपेक्षा गुरप्रीतसिंग भुल्लर यांच्याकडे कैक पटीने जास्त संपत्ती आहे.