राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसची फिल्डिंग; क्रॉस वोटिंगच्या धास्तीने आमदार शिमला, बंगळुरूत 'क्वारंटाईन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 20:50 IST2026-03-13T20:50:30+5:302026-03-13T20:50:46+5:30
हरियाणा आणि ओडिशातील राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत 'फोडाफोडी'च्या राजकारणाने जोर धरला असून, काँग्रेसने आपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसची फिल्डिंग; क्रॉस वोटिंगच्या धास्तीने आमदार शिमला, बंगळुरूत 'क्वारंटाईन'
Rajya Sabha Election: येत्या १६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी देशातील राजकीय वातावरण तापले आहे. हरियाणा आणि ओडिशामध्ये आपल्या आमदारांचा घोडेबाजार होऊ शकते आणि क्रॉस वोटिंगचा धोका वाढू शकतो, या भीतीने काँग्रेसने कंबर कसली आहे. हरियाणातील ३१ आमदारांना हिमाचल प्रदेशातील शिमल्यात, तर ओडिशामधील ८ आमदारांना कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये हलवण्यात आले आहे.
हरियाणात पुन्हा खेला होण्याची भीती?
हरियाणा विधानसभेत एकूण ९० जागा असून सध्याच्या गणितानुसार भाजपला एक आणि काँग्रेसला एक जागा सहज मिळायला हवी. भाजपचे संजय भाटिया यांची जागा निश्चित मानली जात आहे. मात्र, दुसऱ्या जागेसाठी काँग्रेसचे कर्मवीर बौद्ध आणि भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सतीश नांदल यांच्यात काटाजोड लढत आहे.
२०१६ मधील प्रसिद्ध शाई कांड आणि २०२२ मध्ये अजय माकन यांचा झालेला पराभव, या दोन्ही वेळी काँग्रेस आमदारांच्या चुकीच्या मतांमुळे किंवा क्रॉस वोटिंगमुळे काँग्रेसला मोठा फटका बसला होता. हाच धोका टाळण्यासाठी यंदा काँग्रेसने आमदारांना शिमल्यात हलवले आहे.
शिमल्यात आमदारांची 'खास' सोय आणि ट्रेनिंग
हरियाणातील ३१ आमदार लक्झरी बसने शिमल्याला रवाना झाले आहेत. हे सर्व आमदार कुफरी येथील एका आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत. आमदारांना मतदानाची तांत्रिक माहिती देण्यासाठी आणि चूक टाळण्यासाठी शिमल्यात बॅलेट बॉक्स सुद्धा नेण्यात आला आहे. तिथे त्यांना प्रत्यक्ष मतदानाचे ट्रेनिंग दिले जाईल.
हरियाणा प्रभारी बी. के. हरिप्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष राव नरेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हा ताफा शिमल्यात दाखल झाला आहे. १६ मार्चला मतदानाच्या दिवशीच हे आमदार थेट चंदीगडला परततील.
ओडिशातही रिसॉर्ट पॉलिटिक्स!
ओडिशामध्ये ४ राज्यसभा जागांसाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत. बीजेडी आणि काँग्रेसने मिळून भाजपला रोखण्यासाठी कूटनीती आखली आहे. ओडिशामधील काँग्रेसचे ८ आमदार सध्या बंगळुरूजवळील एका रिसॉर्टमध्ये आहेत. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर या आमदारांच्या लॉजिस्टिकची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे समजते.
बीजेडीचाही अलर्ट
दुसरीकडे, बीजेडी प्रमुख नवीन पटनायक यांनीही आपल्या सर्व आमदारांना शुक्रवारी आणि रविवारी प्रायोरिटी मीटिंगसाठी बोलावले आहे.
निवडणुकीचे गणित आणि चुरस
हरियाणात काँग्रेसला विजयासाठी ३१ मतांची गरज आहे, पक्षाकडे ३७ आमदार आहेत. मात्र, जुना अनुभव पाहता काँग्रेस प्रचंड सावध आहे. तर ओडिशात भाजपला तिसरी जागा जिंकण्यासाठी ८ अतिरिक्त मतांची गरज आहे. याच संधीचा फायदा घेऊन भाजप अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देऊन काँग्रेस किंवा बीजेडीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू शकते, अशी चर्चा आहे.