राहुल गांधींना दिलासा, अमित शाहांवर केलेली वादग्रस्त टीका, सुप्रीम कोर्टाची खटल्याला स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 15:24 IST2025-01-20T15:24:18+5:302025-01-20T15:24:46+5:30
Rahul Gandhi: एका सभेत राहुल गांधींनी अमित शाहांवर वादग्रस्त टीका केली होती.

राहुल गांधींना दिलासा, अमित शाहांवर केलेली वादग्रस्त टीका, सुप्रीम कोर्टाची खटल्याला स्थगिती
Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरोधात रांचीच्या कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शाहांना खुनी म्हटल्याबद्दल राहुल गांधींविरोधात 2018 मध्ये भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला संपवण्यासाठी राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने झारखंड सरकार आणि तक्रारदाराला नोटीस बजावली आहे.
झारखंड हायकोर्टाने केस रद्द करण्यास दिलेला नकार
'भाजप हा असा पक्ष आहे, ज्याचे नेते खुन्याला पक्षाध्यक्ष म्हणून स्वीकारतात', असे विधान राहुल गांधींनी 2018 मध्ये केले होते. या वक्तव्यामुळे दुखावलेले भाजप कार्यकर्ते नवीन झा यांनी रांची कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला आहे. न्यायालयाने राहुल गांधींना हजर राहण्यासाठी समन्सही बजावले होते. हे प्रकरण रद्द करण्यासाठी राहुल गांधींनी झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर या आदेशाला राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
न्यायालयात युक्तिवाद
हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्यासमोर आले. आज(20 जानेवारी) राहुल गांधींच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले की, नवीन झा ज्यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे, ते थेट प्रभावित झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्या वतीने याचिका दाखल करण्याचे कोणतेही औचित्य नाही. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने झारखंड सरकार आणि तक्रारदार नवीन झा यांना नोटीस बजावली. न्यायालयाने त्यांना चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्यास सांगितले. ते जे उत्तर दाखल करतील, त्यावर राहुल गांधी दोन आठवड्यांत उत्तर दाखल करतील. सुप्रीम कोर्ट 6 आठवड्यांनंतर पुढील सुनावणी करणार आहे.