कर्नाटकसाठी तीन टीएमसी पाणी सोडा, सिद्धरामय्या यांचे फडणवीस यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 14:16 IST2025-04-02T14:15:42+5:302025-04-02T14:16:33+5:30
कृष्णा नदीत दोन, तर भीमा नदीतून एक टीएमसीची मागणी

कर्नाटकसाठी तीन टीएमसी पाणी सोडा, सिद्धरामय्या यांचे फडणवीस यांना पत्र
कोल्हापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उत्तर कर्नाटकातील पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांसाठी तीन टीएमसी पाणी सोडावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस फडणवीस यांना एका पत्राद्वारे मंगळवारी केले आहे.
उत्तर कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, बागलकोट, कलबुर्गी, रायचूर, यादगीर आदी जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली आहे. सध्या तापमान वाढल्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्राने कोयना आणि वारणा धरणातून कृष्णा नदीत दोन टीएमसी आणि उजनी धरणातून भीमा नदीमध्ये एक टीएमसी पाणी सोडून कर्नाटकला द्यावे, असे आवाहन सिद्धरामय्या यांनी या पत्रात केले आहे. मानवतेच्या दृष्टीने महाराष्ट्राने नेहमीच कर्नाटकला उन्हाळ्यामध्ये पाणी सोडून मदत केली आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
सध्या उन्हाळा वाढतो आहे. उत्तर कर्नाटकमध्ये तापमान ४० सेल्सिअसपर्यंत गेले आहे, त्यामुळे पिण्यासाठी आणि पशुधनासाठी पाण्याची गरज आहे. आपण नेहमीप्रमाणे सहकार्य कराल, अशी अपेक्षा आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.