अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 12:07 IST2025-07-04T12:05:10+5:302025-07-04T12:07:38+5:30
Ahmedabad plane crash: अहमदाबादमधील विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्याची घोषणा एअर इंडियाकडून करण्यात आली आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली असून, या दरम्यान विमान अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांनी एअर इंडियावर गंभीर आरोप केले आहेत.

अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
गेल्या महिन्यात १२ जून रोजी लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर भीषण अपघात झाला होता. या अपघातात विमानामधील प्रवासी आणि कर्मचारी तसेच हे विमान कोसळले त्या इमारतीच्या परिसरातील काही व्यक्ती अशा एकूण २७५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्याची घोषणा एअर इंडियाकडून करण्यात आली आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली असून, या दरम्यान विमान अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांनी एअर इंडियावर गंभीर आरोप केले आहेत.
नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये कपात करता यावी यासाठी आर्थिक अवलंबित्वाशी संबंधित कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी एअर इंडियाकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप या नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर आता एअर इंडियाकडूनही यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांनी केलेले हे आरोप बिनबुडाचे असून, विमान कंपनी केवळ नुकसान भरपाईशी संबंधित प्रक्रियेचं पालन करत आहे, असे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. एअर इंडियामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमच्याकडून पाठवण्यात आलेल्या प्रश्नावलीचा उद्देश हा केवळ नुकसान भरपाईचं वितरण योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावं यासाठी कौटुंबिक संबंधांची खात्री करण्याचा आहे. ही एक औपचारिक प्रक्रिया आहे. तसेच तिचं पालन आवश्यक आहे, असं एअर इंडियानं म्हटलं आहे. तसेच पीडितांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचंही एअर इंडियाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, हा अर्ज ई-मेलच्या माध्यमातून किंवा व्यक्तिगतरीत्या जमा केला जाऊ शकतो. कुणाच्याही घरी न सांगात कुठलीही भेट दिली जाणार नाही. तसेच या अपघातानंतर वेगवेगळी पथके तयार करण्यात आली असून ती पीडित कुटुंबांना अंत्यसंस्कार, निवारा आणि इतर व्यवस्था करण्यामध्ये पीडितांच्या नातेवाईकांची मदत करत आहेत. आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांपैकी ४७ जणांच्या कुटुंबांना मदत करण्यात आली आहे. तसेच ५५ कुटुंबांना मदत करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहितीही एअर इंडियाकडून देण्यात आली.
अहमदाबादमधील विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४० हून अधिक प्रवाशांच्या कुटुंबीयांचं प्रतिनिधित्व करत असलेल्या यूकेस्थित स्टुअर्ट या कायदे कंपनीने एअर इंडियावर गंभीर आरोप केला आहे. एअर इंडियाने अशी प्रश्नावली पाठवली आहे, जी कायदेशीररीत्या आर्थिक विवरण देण्यासाठी मृतांच्या कुटुंबीयांवर दबाव आणत आहे, असे त्यांनी या आरोपात म्हटले आहे.
स्टीवर्ट्सचे एक भागीदार असलेल्या पीटर नीननने एअर इंडियावर टीका करताना म्हटले आहे की, पीडित कुटुंबाना अशी प्रश्नावली पाठवण्यात आली आहे, ज्यामध्ये कुठलंही स्पष्टीकरण न देता कायदेशीर अटींचा समावेश केलेला आहे. तसेच नातेवाईकांकडून कायदेशीरदृष्ट्या महत्त्वपूर्ण माहिती मागवण्यात आली आहे. त्यात कायदेशीर संदर्भ असलेल्या शब्दांचा वापर करण्यात आला आहे. तसेच त्याचा वापर हा त्यांच्याविरोधात केला जाऊ शकतो. या कृतीबाबत त्यांना खेद वाटला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.