उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून एक अजब प्रकरण समोर आले आहे. गेल्या ८ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या पतीला पत्नीने अचानक इन्स्टाग्रामवर पाहिले आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पतीने दुसऱ्या महिलेसोबत लग्न केले होते आणि तो तिच्यासोबत रील्स बनवत होता.
काय आहे नेमके प्रकरण?
हरदोई येथील आटामऊ गावात राहणाऱ्या जितेंद्रने २०१७ साली शीलू नावाच्या मुलीशी लग्न केले होते. लग्नानंतर शीलू गर्भवती असतानाच जितेंद्र अचानक बेपत्ता झाला. त्याच्या कुटुंबीयांनी शीलू आणि तिच्या माहेरच्या लोकांवर जितेंद्रचे अपहरण करून त्याची हत्या झाल्याचे म्हणत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून शीलू आपल्या माहेरी आर्थिक संकटात जीवन जगत होती.
असा लागला छडा
शीलूने सांगितले की, तिचा मुलगा आता मोठा झाला आहे. एक दिवस ती नेहमीप्रमाणे मोबाईलवर इन्स्टाग्राम पाहत असताना तिला अचानक एका व्हिडिओमध्ये तिचा पती दुसऱ्या महिलेसोबत दिसला. तिने अनेक लोकांकडून खात्री करून घेतल्यानंतर पोलिसांत पतीविरुद्ध फसवणुकीची आणि दुसऱ्या लग्नाची तक्रार दाखल केली. शीलूने पोलिसांना सांगितले की, तिच्या पतीने लुधियानामध्ये दुसऱ्या महिलेसोबत लग्न केले आहे.
पोलिसांनी केली अटक
या संदर्भात संडीलाचे सीओ संतोष कुमार सिंह यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, पीडित पत्नी शीलूने एक अर्ज दिला होता. त्यात तिचा पती गेल्या ८ वर्षांपासून लुधियानामध्ये राहत आहे आणि त्याने दुसरे लग्न केले आहे, असे म्हटले होते. सोशल मीडियावर आलेल्या बातम्या आणि रील्सची तपासणी केली असता, व्हिडिओतील व्यक्ती शीलूचा बेपत्ता झालेला पती असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.
एकीकडे, पहिली पत्नी आणि मुलाला सोडून दुसरीकडे रील्स बनवणाऱ्या या पतीची आता सर्वत्र चर्चा होत आहे. पोलिसांनी या प्रकरणावर पुढील कारवाई सुरू केली आहे.