लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 20:22 IST2025-11-17T20:16:20+5:302025-11-17T20:22:18+5:30
लाल किल्ला स्फोटाच्या तपासात स्विस ॲप Threema चा वापर. या प्रतिबंधित ॲपमुळे संशयितांचा माग काढणे कठीण. एन्क्रिप्शन आणि VPN चा वापर.

लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या तपासाला आता एक महत्त्वाचे डिजिटल वळण मिळाले आहे. या हल्ल्यातील संशयितांनी गोपनीयतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्विस मेसेजिंग ॲप 'थ्रीमा' चा वापर केल्याचे सुरक्षा यंत्रणांनी उघड केले आहे. या ॲपची अत्यंत मजबूत एन्क्रिप्शन प्रणाली आणि युजरची ओळख लपवण्याची क्षमता यामुळे तपास अधिकाऱ्यांसाठी हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे.
फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठाशी संबंधित असलेल्या तीन डॉक्टरांनी— डॉ. उमर उन नबी, डॉ. मुझम्मिल गणाई आणि डॉ. शाहीन शाहिद — या ॲपचा वापर करून संपूर्ण कट रचल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. थ्रीमा ॲप वापरण्यासाठी मोबाईल नंबर किंवा ईमेलची गरज नसते, केवळ एक रँडम आयडी वापरला जातो. यामुळे संशयित यंत्रणांच्या नजरेतून दीर्घकाळ दूर राहिले.
या तिघांनी ॲपच्या सुरक्षा संरचनेचा फायदा घेऊन एक खासगी सर्व्हर तयार केला होता. याच सर्व्हरद्वारे ते हल्ल्याचे नकाशे, ठिकाणे आणि माहितीची देवाणघेवाण करत होते.
Threema ॲपवर भारतात बंदी का?
थ्रीमा हे ॲप मे २०२३ मध्येच IT कायद्याच्या कलम ६९A अंतर्गत भारतात प्रतिबंधित करण्यात आले आहे. पाकिस्तानस्थित अनेक दहशतवादी गट भारताविरुद्ध प्रचार करण्यासाठी आणि संपर्क साधण्यासाठी अशा हाय-एन्क्रिप्शन ॲप्सचा वापर करत असल्याचे आढळून आले होते, ज्यावर पाळत ठेवणे अशक्य होते. VPN आणि Bitcoin पेमेंटसारख्या पद्धती वापरून बंदी असतानाही या ॲपचा वापर करता येतो.