CoronaVirus News: २७ दिवस पायी चालत गाठले बिहारमधील गाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 03:50 IST2020-05-01T03:50:36+5:302020-05-01T03:50:59+5:30
हरिवंश चौधरी या मजुराने भार्इंदर येथून बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील पंचोभ या आपल्या गावी पायी चालत जाण्याचे ठरविले. ते दरमजल करत अखेर २७ दिवसांनी गावी पोहोचले.

CoronaVirus News: २७ दिवस पायी चालत गाठले बिहारमधील गाव
दरभंगा : कोरोना साथीमुळे महाराष्ट्र सरकारने राज्यात २१ मार्च रोजी लॉकडाऊन लागू केल्यानंतर अडकून पडलेल्या काही लाख मजुरांपैकी एक असलेल्या हरिवंश चौधरी या मजुराने भार्इंदर येथून बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील पंचोभ या आपल्या गावी पायी चालत जाण्याचे ठरविले.
ते दरमजल करत अखेर २७ दिवसांनी गावी पोहोचले.
हरिवंश हे भार्इंदर येथे एका स्टील फॅक्टरीत काम करतात. लॉकडाऊनमुळे फॅक्टरी मालकाने त्यांना सुट्टीवर जाण्यास सांगितले. फॅक्टरी बंद असल्यामुळे हातात रोजगारही नव्हता. रेल्वे तसेच सार्वजजिक , खासगी वाहतूक सेवाही सरकारने स्थगित केल्यामुळे गावाकडे जाण्याचा मार्गही बंद झाला होता. तुटपुंजे पैसे हाती असलेल्या हरिवंश यांनी अखेर बिहारमधील आपल्या गावी पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. भाईंदर ते बिहारमधील गाव यामधील अंतर सुमारे १८०० किमीचे होते. भाईंदरहून निघाले असताना हरिवंश चौधरी यांना वाटेत उत्तर प्रदेश, बिहारच्या दिशेने पायी चालत जाणारा २५ जणांचा एक गट भेटला. हे लोक रोज सकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत चालत.
रात्री एखाद्या आडोशाला किंवा झाडाखाली झोपत. रेल्वेरुळांतून, रस्त्याने ते चालत आपापल्या गावाच्या दिशेने चालत होते.
हरिवंश चौधरी यांनी सांगितले की, या प्रवासात आमच्याकडे दोन वेळचे पुरेसे जेवण कधीच नसायचे. कधी मिळाली तर बिस्किटे, पाव किंवा कधी असेच काहीतरी खाऊन आम्ही भूक भागवायचो. खिशात खूपच कमी पैसे होते. वाटेत काही वेळेस दयाळू लोकांनी आम्हाला जेवणही दिले. काही ट्रकचालकांनी थोडक्या अंतरापर्यंत का होईना आम्हाला पुढे नेऊन सोडले. अशी दरमजल करत अखेर २७ दिवसांनी मी माझ्या गावी पोहोचलो.
१ ४ दिवसांच्या क्वारंटाइनमध्ये रवानगी
हरिवंश चौधरी म्हणाले की, आमची प्रकृती तपासून मुंबई पोलिसांनी आम्हाला एक हेल्थ स्लिप दिली होती. ती विविध राज्यांत जिथे पोलिसांनी हटकले त्यांना दाखवत होते. त्या स्लिपमुळे पोलिसांनी आम्हाला रोखून घरले नाही. दरभंगा जिल्ह्यातील आपल्या गावी पोहोचताच हरिवंश यांना १४ दिवसांच्या क्वारंटाइनमध्ये पाठविण्यात आले. मात्र इतक्या पायपीटीनंतर आपले वडील व कुटुंबीयांना भेटता आल्याचा आनंद हरिवंश चौधरी यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.