यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 10:22 IST2025-11-06T09:15:27+5:302025-11-06T10:22:57+5:30
महादेव बेटिंग अॅप घोटाळ्यातील मुख्य आरोपी रवी उप्पल हा यूएईमधून फरार झाल्याचा दावा केला जात आहे.

यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
Mahadev Betting App Scandal: ६००० कोटी रुपयांच्या महादेव बेटिंग ॲप मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात एक मोठे नाट्यमय वळण आले आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा आरोपी रवी उप्पल दुबईतून अचानक पसार झाल्याने भारतीय तपास यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारावर दुबई पोलिसांनी उप्पलला अटक केली होती. त्यानंतर, भारत सरकारने तातडीने आणि अधिकृत राजनैतिक माध्यमांतून संयुक्त अरब अमिरातकडे त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती केली होती. मात्र, आता यूएईने ही विनंती मिळाली नसल्याचा दावा करत उप्पलला कोठडीतून सोडून दिले आणि तो गायब झाला.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आरोपीच्या अटकेनंतर ४५ ते ६० दिवसांच्या आत प्रत्यार्पण विनंती पाठवणे बंधनकारक असते. भारताने ती विनंती वेळेत आणि पुराव्यांसह पाठवल्याचे भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याउलट, यूएईने अशी कोणतीही विनंती करण्यात आली नसल्याचे म्हटले. त्यामुळे त्यांनी रवी उप्पलला सोडून दिले. यूएईने भारताला त्याची सुटका आणि तो कोणत्या देशात गेला, याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधामध्ये पहिल्यांदाच तणाव निर्माण झाला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेही तीव्र नाराजी आणि आश्चर्य व्यक्त केले आहे. न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने आरोपी उप्पलच्या गायब होण्याच्या कृतीवर तीव्र संताप व्यक्त केला. "हे न्यायालयाच्या विवेकाला धक्का देणारे आहे. आम्ही अशा गुन्हेगारांना न्यायालयांना आणि तपास यंत्रणांना खेळणं बनवण्याची परवानगी देऊ शकत नाही. आता काहीतरी करावेच लागेल," अशा शब्दांत कोर्टाने नाराजी व्यक्त केली.
सुप्रीम कोर्टाने ईडीला उप्पलचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याला अटक करण्याचे थेट निर्देश दिले आहेत. ईडीकडून बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी कोर्टाला माहिती दिली की, असे आर्थिक गुन्हेगार अनेकदा ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्ससारख्या देशांमध्ये पळून जातात, जिथे भारताचे प्रत्यार्पण करार नाहीत.
महादेव ऑनलाईन बुक ॲपचा वापर भारतात अवैध सट्टेबाजी, हवाला आणि मनी लॉन्ड्रिंगसाठी केला जात होता. हा घोटाळा सुमारे ६,००० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा असून तो अनेक राज्यांमध्ये पसरलेला आहे. या सिंडिकेटचा दुसरा प्रमुख प्रमोटर सौरभ चंद्राकर यालाही इंटरपोल नोटीसच्या आधारावर दुबईत ऑक्टोबर २०२४ मध्ये अटक करण्यात आले असून, त्याचे प्रत्यार्पण अद्याप प्रलंबित आहे. या प्रकरणात कथितरित्या ५०० कोटींहून अधिक लाचेचा संबंध छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्याशी जोडला गेला होता. या प्रकरणाचा तपास आधी छत्तीसगड पोलिसांकडे होता, जो नंतर सीबीआयकडे सोपवण्यात आला.