श्रीराम आग नाही, ऊर्जा आहेत; काही लोकांनी आपले विचार बदलण्याची गरज- पीएम नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 03:48 PM2024-01-22T15:48:50+5:302024-01-22T15:49:39+5:30

'हा वियोग फक्त 14 वर्षांचा नाही, तर अयोध्येने शेकडो वर्षांपासून सहन केला आहे. आजपासून हजारो वर्षांनंतरही लोक ही तारीख लक्षात ठेवतील.'

Ram Mandir Ayodhya : Shri Ram is not fire, but energy; Some people need to change their minds- PM Modi | श्रीराम आग नाही, ऊर्जा आहेत; काही लोकांनी आपले विचार बदलण्याची गरज- पीएम नरेंद्र मोदी

श्रीराम आग नाही, ऊर्जा आहेत; काही लोकांनी आपले विचार बदलण्याची गरज- पीएम नरेंद्र मोदी

Ram Mandir Ayodhya : अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते संपन्न झाली. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज भगवान श्रीराम त्यांच्या भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. देशभरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्यानंतर नरेंद्र मोदींनी उपस्थित साधू संत आणि निमंत्रित मान्यवरांना संबोधित केले. यावेळी त्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. 

राम वाद नाही, उपाय आहे
यावेळी पीएम मोदी म्हणाले , राम मंदिराने प्रत्येकासाठी उज्ज्वल भविष्याची प्रेरणा दिलीय. राम वाद नाही, राम उपाय आहे, राम वर्तमान नाही, राम शाश्वत आहेत. राम सर्वव्यापी आहेत. आज अयोध्येत केवळ श्रीरामाच्या मूर्तीचेच अभिषेक झाला नाही, तर श्रीरामाच्या रुपातील भारतीय संस्कृतीवरील अतूट श्रद्धेचाही अभिषेक झाला आहे. हे मानवी मूल्यांचे आणि सर्वोच्च आदर्शांचे मूर्त स्वरुपदेखील आहे.

पीएम मोदींनी मागितली रामाची माफी 
पीएम मोदी पुढे म्हणाले की, आज मी प्रभू श्रीराम यांची माफी मागतो. आमच्या परिश्रमात, त्यागात आणि तपश्चर्यामध्ये काहीतरी उणीव राहिली असावी, ज्यामुळे हे काम इतक्या शतकांपासून करू शकलो नाही. पण, आज ती उणीव भरुन निघाली आहे. मला विश्वास आहे की, आज प्रभू राम आपल्याला नक्कीच क्षमा करतील.

रामलला तंबूत राहणार नाहीत
अनेक शतकांच्या प्रतीक्षेनंतर आज आपले रामलला आले आहेत. माझा कंठ दाटून आला आहे, माझे मन अजूनही त्या क्षणात गढून गेला आहे. आमचे रामलला आता तंबूत राहणार नाहीत, आता रामलला दिव्य मंदिरात राहणार आहेत. त्याग आणि तपश्चर्येनंतर आपले राम आले आहेत. हा वियोग फक्त 14 वर्षांचा नाही, तर अयोध्येने शेकडो वर्षांपासून सहन केला आहे. आजपासून हजारो वर्षांनंतरही लोक ही तारीख लक्षात ठेवतील. आमच्यासाठी ही केवळ विजयाचीच नाही, तर नम्रतेचीही संधी आहे. आपला देश पूर्वीपेक्षा खूप सुंदर होणार आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.

काळाच्या चक्रातील अमिट रेषा...
पीएम मोदी पुढे म्हणाले की, आज मला पूर्ण पवित्र मनाने वाटते की, काल चक्र बदलत आहे. हा सुखद संयोग आहे की, आम्हाला आमच्या पिढीला कालजयी पथाचे शिल्पकार म्हणून निवडले गेले. हजारो वर्षांनंतरची पिढी राष्ट्रनिर्माणाबाबतच्या आमच्या कार्याची आठवण काढेल. म्हणून मी सांगतो की हीच योग्य वेळ आहे. आता आपण याच वेळेपासून पुढील एक हजार वर्षांनंतरच्या भारताची पायाभरणी केली पाहिजे. मंदिर निर्मितीपासून पुढे जाऊन आता आपण सर्व देशवासियांनी या घडीपासून एक समर्थ, सक्षम, भव्य, दिव्य भारताच्या निर्मितीची शपथ घेऊया. रामाचे विचार मानसासोबत जनमानसामध्ये असणं हीच राष्ट्रनिर्मितीची पायरी आहे, असे मोदींनी सांगितले. 

Web Title: Ram Mandir Ayodhya : Shri Ram is not fire, but energy; Some people need to change their minds- PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.