घरच्यांनी वाचवलं पण रुग्णवाहिकेने घेतला जीव; विचित्र घटनेत हॉस्पिटल बाहेरच महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:54 IST2025-01-20T16:33:46+5:302025-01-20T16:54:22+5:30
राजस्थानमधून रुग्णवाहिकेत अडकल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.

घरच्यांनी वाचवलं पण रुग्णवाहिकेने घेतला जीव; विचित्र घटनेत हॉस्पिटल बाहेरच महिलेचा मृत्यू
Rajasthan Shocking News: राजस्थानच्या भिलवाडामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. हॉस्पिटलच्या बाहेरच एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. महिला रुग्णाला घेऊन आलेली रुग्णवाहिका वेळेवर पोहोचूनही महिलेला वाचवता आले नाही. महिलेच्या मृत्यूबाबत निष्काळजीपणाचा आरोप करत कुटुंबीयांनी गोंधळ घातला. हॉस्पिटलच्या गेटपर्यंत पोहोचलेल्या रुग्णवाहिकेचा दरवाजा असा अडकला की रुग्णाला बाहेर काढणे कठीण झाले आणि एवढा वेळ गेला की महिलेचा मृत्यू झाला. तब्बल २० मिनिटे महिला आतमध्ये अडकून पडली होती.
भीलवाडाच्या प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडला. पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी बराच वेळ रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा लॉक असल्यामुळे उघडता येत नव्हता. शेवटी कुटुंबियांनी रुग्णवाहिकेची काच फोडून महिलेला बाहेर काढण्याचे ठरवलं. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. या धक्कादायक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये महिलेचे कुटुंबीय रुग्णवाहिकेचा दररवाजा उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलिंडर नसल्याचाही आरोप कुटुंबीयांनी केला.
जवाहरनगर येथील ४६ वर्षीय सुलेखा नावाच्या महिलेने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने कुटुंबियांनी ते पाहिले आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र त्यानंतर अशी काही परिस्थिती निर्माण झाली की प्रयत्न करुनही सुलेखा यांना वाचवता आले नाही.
"रविवार असल्याने मी उशिरापर्यंत झोपून होतो. फोन वाजल्यावर मला जाग आली तेव्हा मला आई फासावर लटकलेली दिसली. माझा धाकटा भाऊ आणि वडिलांनी तिला फासावरुन खाली उतरवले आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने हॉस्पिटलला रवाना झाले. त्यावेळी आई श्वास घेत होती. त्या रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडर पूर्णपणे काम करत नव्हता. दुसरीकडे ड्रायव्हरही रस्ता चुकला आणि मग आम्ही कसेतरी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा दरवाजा अडकून पडला. या सगळ्यात २० मिनिटे गेली. त्यामुळे माझ्या आईचा तिथेच मृत्यू झाला," असं सुलेखा यांचा मुलगा गौरवने सांगितले.
दुसरीकडे, 'भिलवाडा जिल्ह्यात ३२ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. रुग्णवाहिकेत तांत्रिक बिघाड नव्हता. रुग्णवाहिकेच्या सिलेंडरमध्ये ऑक्सिजनही आहे, कोणीही तपासू शकतो. रुग्णवाहिका अजूनही पोलीस ठाण्यात उभी आहे, अशी माहिती भिलवाडा येथील मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. सीपी गोस्वामी यांनी दिली.
तर महिलेच्या आत्महत्येची माहिती मिळाली होते. पोलीस पोहोचेपर्यंत कुटुंबीयांनी महिलेला घरातून बाहेर काढून रुग्णालयात नेले होते. कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर अनेक आरोप केले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर परिस्थिती स्पष्ट होईल. सध्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली नाही, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.