“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:34 IST2025-06-20T13:34:35+5:302025-06-20T13:34:59+5:30

कासिम रझा यांची मुलगी यमन रझा तिच्या पती आणि दोन मुलांसह या युद्धक्षेत्रात अडकली आहे.

raipur iran israel war daughter family stuck in iran told condition on phone father worried | “पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती

“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती

इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाचा परिणाम जगभर पाहायला मिळत आहे. याच दरम्यान छत्तीसगडमधील एका कुटुंबाला हे संकट खूप मोठं वाटत आहे. कारण रायपूर मध्यवर्ती कारागृहात ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या कासिम रझा यांची मुलगी यमन रझा तिच्या पती आणि दोन मुलांसह या युद्धक्षेत्रात अडकली आहे.

यमन आणि तिचे पती एजाज जैदी गेल्या सहा वर्षांपासून इराणमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचं कुटुंब स्टूडंट व्हिसावर तिथे राहत आहे. पण, आता इराण आणि इस्रायलमधील परिस्थिती युद्धासारखी झाली आहे, तेव्हा तिथे राहणं खूप धोकादायक झालं आहे. मुलीने तिथल्या परिस्थितीची माहिती तिच्या वडिलांना फोनवर दिली होती. परिस्थिती जाणून घेतल्यानंतर  आता संपूर्ण कुटुंब चिंतेत आहे. त्यांनी सरकारलाही आवाहन केलं आहे.

“प्रचंड भीती वाटतेय, आम्हाला भारतात बोलवा”

कासिम रझा यांनी न्यूज18 ला दिलेल्या माहितीत सांगितलं की, "मी माझ्या मुलीशी शेवटचं १७ जून रोजी बोललो होतो. ती खूप घाबरली होती. ती म्हणाली, पप्पा, आम्ही सुरक्षित नाही, परिस्थिती खूप वाईट आहे. आम्हाला प्रचंड भीती वाटत आहे. आम्हाला भारतात बोलवा. त्यानंतर फोन अचानक कट झाला. तेव्हापासून कोणताही संपर्क झालेला नाही. त्यामुळे आता मलाही भीती वाटत आहे.”

“कुटुंबाची सर्वात मोठी चिंता ही आहे की आता ना फोन येत आहे, ना कोणत्याही प्रकारचा मेसेज येत आहे. भारतीय दूतावासाला सुरक्षित परतीसाठी अर्ज करण्यात आला आहे, परंतु आतापर्यंत कोणतेही उत्तर आलेलं नाही.”

“आम्हाला प्रत्येक क्षणी काळजी वाटतेय”

कासिम रझा यांनी सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाला भावनिक आवाहन केलं आहे की, "आमच्या मुलीला आणि तिच्या कुटुंबाला सुरक्षितपणे भारतात परत आणावं. ते युद्धाच्या काळात तिथे अडकले आहेत. सध्या ते नेमक्या कोणत्या परिस्थितीत आहेत हे आम्हाला माहित नाही. आम्हाला प्रत्येक क्षणी काळजी वाटत आहे."
 

Web Title: raipur iran israel war daughter family stuck in iran told condition on phone father worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.