दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 23:05 IST2025-10-02T23:05:05+5:302025-10-02T23:05:40+5:30
Ravan Dahan: गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आज दुसऱ्यादिवशी उत्तर भारतातील अनेक भागात जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे दिल्ली, नोएडा, पाटणा, जौनपूर या शहरांसह इतर ठिकाणी रामलीला मैदानांवर आयोजित रावण दहनाच्या कार्यक्रमांना मोठा फटका बसला.

दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आज दुसऱ्यादिवशी उत्तर भारतातील अनेक भागात जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे दिल्ली, नोएडा, पाटणा, जौनपूर या शहरांसह इतर ठिकाणी रामलीला मैदानांवर आयोजित रावण दहनाच्या कार्यक्रमांना मोठा फटका बसला.
नोएडा येथील रामलीला मैदानावर मुसळधार पावसामुळे रावण, मेघनाद, कुंभकर्ण यांचे पुतळे भिजले. तर रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले लोकही पावसापासून बचावासाठी इकडेतिकडे पळताना दिसत होते.
तर दिल्लीतील इंद्रप्रस्थ येथील रामलीला मैदानात आयोजित रावण दहनाच्या कार्यक्रमातही पावसामुळे व्यत्यय आला. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आगमन होण्यापूर्वी पाऊस सुरू झाला. त्यामुळे रावणासह दहशतवादाचे प्रतीक म्हणून तयार करण्यात आलेले पुतळे भिजले. लाल किल्ला परिसरात आयोजित रावण दहनाच्या कार्यक्रमावरही पावसाने पाणी फिरवले. त्यानंतर आयोजकांनी रावणाचे पुतळे झाकून ठेवण्याची व्यवस्था केली. उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यातील शाहजंग येथील रामलीला मैदानात मुसळधार पावसामध्येच रावण दहन करण्यात आले. पावसामुळे रावणाचा पुतळा कोसळला. मात्र आयोजकांनी रावणाच्या पुतळ्याचं तिथेच दहन केलं. यादरम्यान, उपस्थितांनी छत्र्यांमधून रावण दहन पाहिलं.
बिहारमधील पाटणा येथील गांधी मैदान येथेही रावण दहनाची तयारी सुरू असताना पाऊस पडायला सुरुवात झाली. त्यामुळे रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथाचे पुतळे भिजून गेले. तसेच पावसामुळे रावणाचं डोकं तुटून खाली कोसळलं. विजयादशमीच्या मुहुर्तावर रावण दहनासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती. मात्र त्यांच्या उत्साहावर पावसामुळे विरजण पडलं.