राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, भाजपच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी नोंदवली FIR
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 21:47 IST2024-12-19T21:46:55+5:302024-12-19T21:47:54+5:30
संसदेतील धक्काबुक्की प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, भाजपच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी नोंदवली FIR
नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संसद परिसरातील धक्काबुक्की प्रकरणात भाजपच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींवर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेत्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या 117,125,131,3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#UPDATE | BJP MPs injured case: Delhi Police has filed an FIR against Congress leader Rahul Gandhi on BJP's complaint. Police have only removed section 109 (attempt to murder) of BNS. All other sections are the same as given in the complaint: Delhi Police
— ANI (@ANI) December 19, 2024
BJP had filed a… https://t.co/OL8ofV9X1Z
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरुन देशातील राजकारण तापले आहे. याविरोधात आज सर्व विरोधी पक्षांनी संसद परिसरात निदर्शने केली. यावेळी काँग्रेस आणि भाजप खासदारांमध्ये धक्काबुक्की झाली. यात भाजपचे दोन खासदार जखमी झाले असून, याप्रकरणी भाजपने राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली आहे.
घटनेची सुरुवात कशी झाली?
गृहमंत्री अमित शाह यांच्या बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्याविरोधात काँग्रेस पक्ष संसदेत निदर्शने करत होता. त्याचवेळी भाजपकडूनही काँग्रेसविरोधात निदर्शने केला जात होती. यादरम्यान, गुरुवारी सकाळी 10.40 वाजता काँग्रेस खासदार संसदेच्या मकरद्वार गेटजवळ आले. येथेच भाजपचे खासदार निदर्शने करत होते. अशात भाजप आणि काँग्रेसचे खासदार एकमेकांसमोर उभे ठाकले होते. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. ही घटना सुमारे 20 मिनिटे चालली. भाजप खासदारांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे धक्काबुक्कीला सुरुवात झाली.
यावेळी भाजप खासदार प्रताप सारंगी आणि भाजप खासदार मुकेश राजपूत जखमी झाले. या घटनेनंतर भाजपने राहुल गांधींवर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला. तर, काँग्रेसने भाजपवर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार केसी वेणुगोपाल म्हणाले की, प्रत्यक्षात भाजप खासदारांनी राहुल गांधींना घेरले आणि जाणूनबुजून संसदेत जाण्यापासून रोखले. याप्रकरणी काँग्रेसने सभापतींकडे तक्रार केली आहे.