VIDEO: संसदेच्या गेटवर राडा! राहुल गांधींनी गद्दार म्हटल्याने बिट्टू भडकले, म्हणाले "देश के दुश्मन..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 12:42 IST2026-02-04T12:38:30+5:302026-02-04T12:42:35+5:30
विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी टीका केल्यानंतर केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

VIDEO: संसदेच्या गेटवर राडा! राहुल गांधींनी गद्दार म्हटल्याने बिट्टू भडकले, म्हणाले "देश के दुश्मन..."
Rahul Gandhi Jabs Minister Ravneet Bittu: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बुधवारी संसद परिसरात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. मकर द्वारपाशी काँग्रेस खासदारांचे आंदोलन सुरू असताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्यात जोरदार वाक् युद्ध रंगले. राहुल गांधींनी बिट्टू यांना गद्दार दोस्त म्हटले, तर बिट्टू यांनी गांधींना थेट देशाचा शत्रू म्हणत पलटवार केला. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काँग्रेसचे आठ खासदार निलंबित झाल्याच्या निषेधार्थ राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली मकर द्वारावर निदर्शने सुरू होती. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू तेथून जात असताना राहुल गांधींनी त्यांच्याकडे पाहून उपहासाने म्हटले, "बघा, एक गद्दार इथून जात आहे, त्याचा चेहरा बघा." इतकेच नाही तर राहुल गांधींनी हात मिळवण्यासाठी हात पुढे करत म्हटले, "नमस्ते भाई, माझ्या गद्दार मित्रा! काळजी नको करू, तू पुन्हा (काँग्रेसमध्ये) परत येशील."
राज्यमंत्री बिट्टू यांचा पलटवार
राहुल गांधींनी मैत्रीचा हात पुढे केला खरा, पण रवनीत बिट्टू यांनी तो झिडकारला आणि चोख प्रत्युत्तर दिले. "देशाच्या शत्रूंशी माझा काहीही संबंध नाही," असं बिट्टू यांनी म्हटलं. राहुल गांधींना देशाचा शत्रू म्हणत त्यांनी हात मिळवण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ खडाजंगी झाली आणि ते एकमेकांकडे पाहत पुढे निघून गेले.
रवनीत सिंह बिट्टू यांचा राजकीय प्रवास राहुल गांधींच्या भेटीतूनच सुरू झाला होता. बिट्टू हे तीन वेळा काँग्रेसचे खासदार राहिले आहेत. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुकीत पराभव होऊनही भाजपने त्यांना मंत्रिपद दिले. खलिस्तानी दहशतवाद्यांनी बिट्टू यांच्या आजोबांची (बेअंत सिंह) हत्या केली होती, त्यामुळे बिट्टू हे कट्टरतावाद्यांचे प्रखर विरोधक मानले जातात.
#WATCH | Delhi: As Union MoS Ravneet Singh Bittu passes by the protesting Congress MPs at Makar Dwar, Lok Sabha LoP Rahul Gandhi says, "Here is a traitor walking right by. Look at the face..."
— ANI (@ANI) February 4, 2026
LoP Rahul Gandhi offered to shake his hands, saying, "Hello brother, my traitor… pic.twitter.com/5wMgjM8KAW
राहुल गांधींवर यापूर्वीही टीका
दोन्ही नेत्यांमधील हा संघर्ष नवा नाही. सप्टेंबर २०२४ मध्ये बिट्टू यांनी राहुल गांधींवर शिखांना विभागण्याचा आरोप करत त्यांना देशातील नंबर एकचा दहशतवादी म्हटले होते. अमेरिकेत राहुल गांधींनी शिखांच्या संदर्भात दिलेल्या विधानानंतर हा वाद टोकाला गेला होता.
दुसरीकडे, भारत-अमेरिका व्यापार करारावरून काँग्रेस खासदार संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. पंतप्रधानांनी तडजोड केली, असे फलक त्यांच्या हातात होते. मंगळवारी गैरवर्तवणुकीच्या कारणावरून निलंबित करण्यात आलेल्या ८ खासदारांनीही या आंदोलनात सहभाग घेतला होता.