"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:23 IST2025-10-03T12:21:12+5:302025-10-03T12:23:30+5:30
राहुल गांधी यांनी बजाज पल्सरसोबत स्वतःचा फोटो शेअर करत केंद्र सरकारवर टीका केली.

"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
Rahul Gandhi :काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या चार दिवसांच्या कोलंबिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी कोलंबियामधील EIA विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर भारतीय लोकशाहीवर हल्ला करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी ट्विटरवर बजाज, हिरो आणि टीव्हीएसचे कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली. याद्वारे त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर निशाणा केला.
राहुल गांधी यांनी बजाज पल्सरसोबतचा स्वतःचा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यांनी लिहिले की, "कोलंबियामध्ये बजाज, हिरो आणि टीव्हीएस इतके चांगले काम करत आहेत, हे पाहून अभिमान वाटतो. यावरुन असे दिसून येते की, भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर 'इनोव्हेशन'च्या जोरावर यशस्वी होऊ शकतात."
Proud to see Bajaj, Hero & TVS do so well in Colombia.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 3, 2025
Shows Indian companies can win with innovation, not cronyism.
Great job 👍 pic.twitter.com/174HNbF58X
राहुल गांधींनी "क्रोनीझम" या शब्दाचा वापर केंद्र सरकारवर टीका करण्यासाठी वापरला आहे. ‘क्रोनीझम’ म्हणजे, मित्रांना किंवा निकटवर्तीयांना लाभ मिळवून देणे. या शब्दाचा वापर करुन त्यांनी अदानी आणि अंबानी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
भारतातील लोकशाही धोक्यात
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, "भारतामध्ये सध्या सर्वात मोठा धोका म्हणजे लोकशाहीवर होत असलेला हल्ला आहे. भारतात अनेक धर्म, परंपरा, आणि भाषा आहेत. सर्व परंपरा, सर्व धर्म आणि सर्व विचारांसाठी जागा आवश्यक आहे. ती जागा निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लोकशाही व्यवस्था. मात्र, सध्या भारतातील लोकशाही व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात हल्ला होत आहे. लोकशाही हीच सर्वांना संवादाची संधी देते. मात्र सध्या भारतात लोकशाही धोक्यात आली आहे," अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली.
Once again Rahul Gandhi behaves like LoP - Leader of Propaganda
Goes abroad and attacks Indian Democracy! After all he wants to fight Indian state!
Sometimes Demands US UK should intervene into our affairs and now this
From Sena to Judiciary to Sanvidhan to Sanatan ! pic.twitter.com/4mOWacVLGy— Shehzad Jai Hind (Modi Ka Parivar) (@Shehzad_Ind) October 2, 2025
भाजपचा पलटवार
राहुलच्या विधानानंतर भाजपने काँग्रेसवर हल्ला केला. पक्षाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले, "विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुन्हा एकदा प्रचार नेत्यासारखे वागत आहेत. ते परदेशात जातात आणि भारतीय लोकशाहीवर टीका करतात." भाजपच्या प्रदीप भंडारी यांनीदेखील गांधी-वाड्रा कुटुंबावर टीका करत म्हटले की, "राहुल गांधी भारतविरोधी आहेत. त्यांनी भारताला गरीब ठेवण्याचे काम केले. जेव्हा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत ४ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनला आहे, तेव्हा ते ईर्ष्येने आणि द्वेषाने भारताच्या प्रगतीवर हल्ला करत आहेत."