राहुल गांधींनी ट्विटरवरुनही अध्यक्षपद हटवले, आता उरले फक्त 'सदस्य' अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 17:15 IST2019-07-03T17:14:56+5:302019-07-03T17:15:10+5:30
काँग्रेस नेतृत्वावरून सुरू असलेल्या पक्षातील चर्चेत राहुल यांनी निर्णयावर कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.

राहुल गांधींनी ट्विटरवरुनही अध्यक्षपद हटवले, आता उरले फक्त 'सदस्य' अन्...
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काहीही झालं तरी राजीनामा परत घेणार नाही, असं म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, अद्याप नव्या अध्यक्षांची निवड झाली नाही. त्यामुळे राहुल पुन्हा सक्रीय होतील, असा कयास लावला जात होता. तर दुसरीकडे ज्येष्ठ नेत्यांमध्येही अध्यक्षपदावरुन काही नावांची कुजबुज सुरू आहे.
काँग्रेस नेतृत्वावरून सुरू असलेल्या पक्षातील चर्चेत राहुल यांनी निर्णयावर कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. मी आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी नाही, मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नव्या अध्यक्षाची निवड काँग्रेसची कार्यकारी समिती करेल, असेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, राहुल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुनही आपले पद हटविले आहे. ट्विटर अकाऊंटवरील बायोटेडातून राहुल यांनी काँग्रेस प्रेसिडेंट हे पद असलेला शब्द काढून टाकला आहे. त्यामुळे ट्विटरवरही केवळ काँग्रेस पक्षाचा सदस्य आणि लोकसभा सदस्य असेच पद लिहिले आहे.
Rahul Gandhi has removed 'Congress President' from his bio on his Twitter account. pic.twitter.com/32lWzWWoVv
— ANI (@ANI) July 3, 2019
बुधवारी प्रसारमाध्यमांनी संवाद साधताना राहुल गांधी यांनी आपल्या राजीनाम्याविषयी भूमिका स्पष्ट केली. मी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षपदावर आता मी नाही. आता काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण असेल याचा निर्णय पक्षाची कार्यकारी समिती घेईल. तसेच पक्षाने अध्यक्षपदासाठी विनाविलंब निवडणूक घेऊन नव्या अध्यक्षाची निवड केली पाहिजे. आधीच राजीनामा दिलेला असल्याने मी या प्रकियेमध्ये सहभागी नसेन, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.