प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सामील होणार? राहुल गांधींसोबत दिल्लीत दीड तास चर्चा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 20:41 IST2025-12-15T20:40:49+5:302025-12-15T20:41:34+5:30
Rahul Gandhi-Prashant Kishor Meeting: बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर बॅकफूटवर गेले आहेत.

प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सामील होणार? राहुल गांधींसोबत दिल्लीत दीड तास चर्चा...
Prashant Kishor-Rahul Gandhi Meeting: बिहार विधानसभा निवडणुकीत अतिशय खराब कामगिरी करणाऱ्या जनसुराज पक्षाचे संस्थापक आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोरकाँग्रेससोबत जाणार का? असा प्रश्न सध्या विचारला जातोय. याचे कारण म्हणजे, त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेटली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
10 जनपथवर दीड तासांची बैठक
मीडिया रिपोर्सनुसार, शुक्रवारी (12 डिसेंबर 2025) नवी दिल्लीतील 10 जनपथ येथे राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांच्यात सुमारे दीड तास अनौपचारिक पण महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीदरम्यान प्रियंका गांधीदेखील उपस्थित होत्या.
कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
या बैठकीत प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाचे काँग्रेसमध्ये संभाव्य विलिनीकरण कोणत्या स्वरूपात आणि कोणत्या प्रक्रियेत होऊ शकते, यावर प्राथमिक पातळीवर विचारमंथन झाल्याची माहिती आहे.
याशिवाय, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील सध्याची राजकीय परिस्थिती, बिहार निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाची भूमिका, एसआयआर (SIR) संबंधित मुद्दे, कथित मतांची चोरी, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, तसेच 2027 मध्ये उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाबसह इतर राज्यांतील विधानसभा निवडणुका, या विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली आहे.
काँग्रेस मजबूत करण्याचा प्रस्ताव
प्रशांत किशोर आणि काँग्रेस यांचे संबंध गेल्या काही वर्षांत चढ-उताराचे राहिले आहेत. 2021 मध्ये प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला देशभरात पुन्हा मजबूत करण्यासंदर्भात एक प्रस्ताव दिला होता. 2022 मध्ये त्यांनी सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ येथील निवासस्थानी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर सविस्तर सादरीकरणही केले होते. त्यानंतर, काँग्रेसने 2024 लोकसभा निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या एका विशेष टीममध्ये प्रशांत किशोर यांना सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते. मात्र, त्यांनी ते आमंत्रण नाकारले होते.
राजकीय संकेत काय?
आता बिहार निवडणुकीतील अपयशानंतर आणि राहुल गांधींसोबत झालेल्या या महत्त्वपूर्ण भेटीनंतर, प्रशांत किशोर काँग्रेससोबत नव्या भूमिकेत जोडले जाणार का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आगामी काळात या भेटीचे राजकीय परिणाम अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.