राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 14:46 IST2026-04-04T14:43:05+5:302026-04-04T14:46:31+5:30
Congress Rahul Gandhi News: राहुल गांधी हे पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका करत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते केंद्र सरकारच्या भूमिकेचे कौतुक करत आहेत.

राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
Congress Rahul Gandhi News: अमेरिका इस्रायल इराण युद्धामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतालाही या युद्धाची मोठी झळ बसत आहे. देशात इंधन टंचाई वाढत असून, एलपीजी सिलिंडर पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. युद्धाच्या भारतावरील प्रभाव, एलपीजी आणि इंधन संकट तसेच अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम यावरून काँग्रेस पक्षाकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. या लढाईत काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी एकाकी पडत असल्याचे म्हटले जात आहे. कारण काँग्रेसमधील बड्या दिग्गज नेत्यांनी राहुल गांधी यांच्या भूमिकेपासून फारकत घेऊन पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या बाजूने विधाने केली आहेत.
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात एलपीजीचे संकट निर्माण झाले आहे. या मुद्द्यावर काँग्रेस नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. एकीकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर आणि संकट व्यवस्थापनावर टीका करत आहेत, तर दुसरीकडे पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते सरकारच्या भूमिकेचे कौतुक करत आहेत.
शशी थरूर यांचे परस्परविरोधी विधान
कमलनाथ, आनंद शर्मा, शशी थरूर आणि मनीष तिवारी यांसारख्या प्रमुख नेत्यांच्या वक्तव्यांमुळे काँग्रेस नेतृत्वाच्या अडचणी वाढल्या आहेत. राहुल गांधींनी अमेरिका-इस्रायल-इराण युद्धावरील भारताच्या परराष्ट्र धोरणाला 'तडजोड करणारे' म्हटले, तर त्यांच्याच पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी त्याला 'जबाबदार राजकारण' म्हटले आहे.
सरकार योग्य गोष्ट करत आहे
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचा निषेध करण्याचे आवाहन केले. दुसरीकडे काँग्रेस नेते आनंद शर्मा आणि कमलनाथ यांनी सरकारची प्रशंसा केली. पश्चिम आशियातील युद्धाबद्दल एका टीव्ही वृत्तवाहिनीवर बोलताना काँग्रेस खासदार मनीष तिवारी म्हणाले होते की, सरकार कदाचित योग्य गोष्ट करत आहे. माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले की, भारताने संभाव्य धोके टाळून संकट चांगल्या प्रकारे हाताळले आहे. राष्ट्रीय हितासाठी परिपक्व प्रतिसाद देणे ही काळाची गरज आहे.
दरम्यान, कमलनाथ यांनीही एलपीजी पुरवठ्याबाबत आपल्याच पक्षाच्या भूमिकेशी फारकत घेत, असा कोणताही तुटवडा नाही. टंचाई आहे, असे केवळ वातावरण तयार केले जात आहे, असे सांगितले. काँग्रेस पक्षातील या मतभेदांवर भाजपाने प्रतिक्रिया दिली आहे. आता काँग्रेस नेते कमलनाथ यांनी स्वतःच कबूल केले आहे की, देशात गॅस किंवा इंधनाची कमतरता नाही. काँग्रेस पक्षाने राजकीय फायद्यासाठी लोकांमध्ये भीती निर्माण करणे थांबवावे, असा पलटवार केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केला.