राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 11:58 IST2025-07-16T11:57:22+5:302025-07-16T11:58:49+5:30
Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी लखनौ न्यायालयात मानहानीच्या खटल्यात हजर झाले होते.

राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी लखनौ न्यायालयात मानहानीच्या खटल्यात हजर झाले. खासदार-आमदार न्यायालयाने त्यांना तात्काळ जामीनही मंजूर केला. भारतीय सैन्याच्या सैनिकांविरुद्ध कथित अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध हा खटला दाखल करण्यात आला होता. दरम्यान, राहुल यांच्यावर आतापर्यंत सुमारे २ डझन गुन्हे दाखल आहेत. राहुल गांधी हे केंद्र आणि त्यांच्या धोरणांविरुद्ध सतत आवाज उठवतात. त्यांच्याविरोधातील बहुतांश एफआयआर राजकारणाशी संबंधित आहेत. त्यांच्या समर्थकांचा आरोप आहे की राहुल यांच्याविरुद्ध राजकीय हेतूने एफआयआर दाखल केले जातात.
लष्कराच्या विरोधात टिप्पणी आणि जामीन
राहुल गांधी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती की, २०२२ मध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी ९ डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर भारतीय सैन्य आणि चिनी सैन्यात झालेल्या चकमकीचा उल्लेख केला होता. या दरम्यान, ते म्हणाले होते की, लोक भारत जोडो यात्रेबद्दल विचारतील, परंतु चिनी सैनिकांनी आमच्या सैनिकांना केलेल्या मारहाणीबद्दल एकदाही विचारणार नाहीत. हा खटला याच कथित अपमानास्पद टिप्पणीशी संबंधित आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरण
राहुल गांधी यांच्याविरुद्धचा सर्वात महत्त्वाचा खटला म्हणजे नॅशनल हेराल्डशी संबंधित खटला. दिल्लीतील एका न्यायालयाने १४ जुलै रोजी या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्याबाबत आपला आदेश राखून ठेवला होता. न्यायालय आता २९ जुलै रोजी दखल घेण्याबाबत आपला आदेश देऊ शकते. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राहुल गांधी, तसेच त्यांची आई सोनिया गांधी आणि इतर अनेकांवर नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. माजी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या तक्रारीवरून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती.
दुहेरी नागरिकत्व प्रकरण
राहुल गांधी यांच्यावर दुहेरी नागरिकत्व (भारत आणि ब्रिटन) असल्याचा आरोप आहे. भाजप कार्यकर्ते एस विघ्नेश शिशिर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेनुसार, त्यांचे दुहेरी नागरिकत्व भारतीय दंड संहिता आणि पासपोर्ट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. हा खटला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात सुरू आहे. अलीकडेच १२ जुलै रोजी लखनौ खंडपीठात विघ्नेश यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. लंडन, व्हिएतनाम आणि उझबेकिस्तानमधील व्हिडिओंसह इतर अनेक पुरावे देखील याचिकेद्वारे सादर करण्यात आले आहेत.
सावरकरांवरील टिप्पणी
स्वातंत्र्यसेनानी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दोन वर्षांपूर्वी, १२ एप्रिल २०२३ रोजी पुणे दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. यामध्ये त्यांनी आरोप केला होता की, राहुल गांधीनी त्यांच्या युके दौऱ्यादरम्यान सावरकरांविरुद्ध खोटे आणि दुर्भावनापूर्ण विधाने केली होती. सात्यकी यांनी आरोप केला होता की लंडनमधील एका कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी म्हणाले होते की सावरकरांनी एक पुस्तक लिहिले होते ज्यामध्ये त्यांनी सांगितले होते की त्यांनी त्यांच्या मित्रांसह एकदा एका मुस्लिम माणसाला मारहाण केली होती आणि त्या दिवशी त्यांना खूप मजा आली होती. सात्यकी यांनी असा युक्तिवाद केला की सावरकरांनी असे कोणतेही पुस्तक लिहिले नव्हते.
राहुल गांधींविरोधात इतके गुन्हे...
- ठाण्यात सावरकरांबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल मानहानीचा खटला
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला २१ व्या शतकातील कौरव म्हणल्याप्रकरणी हरिद्वारमध्येही मानहानीचा खटला
- मोदी आडनावावरुन केलेल्या टिप्पणीवरुन रांचीमध्येही २० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला
- याच प्रकरणात सुशील मोदी यांनी पाटण्यामध्येही मानहानीचा खटला दाखल केला
- अमित शाहांना खुनातील आरोपी म्हटल्याप्रकरणी अहमदाबादमध्ये फौजदारी मानहानीचा खटला
- नोटाबंदीवरुन अमित शाहांवर मनी लाँड्रिंगचा आरोप केल्याप्रकरणी अहमदाबादमध्ये आणखी एक मानहानीचा खटला
- राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केल्याप्रकरणी मुंबईच्या गिरगाव दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा खटला
- ६ मार्च २०१४ रोजी एका निवडणूक सभेत महात्मा गांधींच्या हत्येत आरएसएसचा सहभाग असल्याची टीका केल्याप्रकरणी भिवंडीत खटला
- पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा संबंध आरएसएसशी जोडण्याल्याप्रकरणी २०१८ मध्ये मुंबईतील न्यायालयात खटला
- काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत भाजपविरुद्ध अपमानास्पद विधाने केल्याबद्दल २०१८ मध्ये रांची येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात राहुल यांच्याविरुद्ध फौजदारी मानहानीचा खटला
- आरएसएस कार्यकर्त्यांनी बारपेटा येथील एका मठात प्रवेश दिला नसल्याचा आरोप केल्याप्रकरणी २०१६ मध्ये गुवाहाटीतील कामरूप येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला
- भारत जोडो यात्रेचे थीम सॉंग परवानगीशिवाय तयार करून कॉपीराइट उल्लंघन केल्याप्रकरणी २०२२ मध्ये खटला
- २०२२ मध्येच वीर सावरकर यांच्यावरील वादग्रस्त टिप्पणीसाठी लखनऊमध्ये आणखी एक खटला
- संसदेत अमित शाह यांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील टिप्पणीवरुन संसदेच्या आवारात झालेल्या गोंधळाबाबत २०२४ मध्ये राहुल गांधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
राहुल गांधींविरुद्ध आतापर्यंत मानहानीचे डझनभर खटले सुरू आहेत. त्या सर्वांमध्ये ते जामिनावर आहेत. हे सर्व खटले प्रलंबित आहेत किंवा त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. मानहानीच्या एका प्रकरणात त्यांना पुढील महिन्यात चाईबासा विशेष न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.