"सारखं आंबेडकर म्हणायची फॅशन आलीय"; शाहांच्या विधानावर राहुल गांधी म्हणाले, "त्रास होणारच कारण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 09:30 IST2024-12-18T09:04:29+5:302024-12-18T09:30:13+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या विधानावरुन राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

"सारखं आंबेडकर म्हणायची फॅशन आलीय"; शाहांच्या विधानावर राहुल गांधी म्हणाले, "त्रास होणारच कारण..."
Rahul Gandhi jibe Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत आक्रमक भाषण केलं. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव सारखं घेण्याची आता फॅशन झाली आहे. देवाचं इतक्या वेळा नाव घेतलं असतं तर सात जन्म स्वर्ग मिळाला असता असं अमित शाह यांनी म्हटलं. अमित शहांच्या या वक्तव्यावर काँग्रेस आणि विरोधक चांगलेच संतापले आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही अमित शाह यांच्या वक्तव्यावरुन पलटवार केला आहे.
राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान विरोधकांवर तोंडसुख घेत अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला होता. 'आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असं सारखं म्हणणं ही आजकाल विरोधकांत फॅशन झाली आहे. देवाचे एवढे नाव घेतले असते तर सात जन्मासाठी स्वर्ग मिळाला असता, असं गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं. आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांमध्ये आंबेडकरांबद्दल प्रचंड द्वेष असल्याचे या टिप्पणीवरून दिसून येते, असा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स पोस्टवरुन अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. "जे मनुस्मृतीला मानतात त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा नक्कीच त्रास होणारच," असं राहुल गांधी यांनी म्हटलं. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचे म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आज सभागृहात बाबासाहेबांचा अपमान केल्याने भाजप आरएसएस तिरंग्याच्या विरोधात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यांच्या पूर्वजांनी अशोक चक्राला विरोध केला होता. संघ परिवारातील लोकांना पहिल्या दिवसापासून भारतीय राज्यघटनेच्या जागी मनुस्मृतीची अंमलबजावणी करायची होती, असं खरगे यांनी म्हटलं.
तर काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रभारी जयराम रमेश यांनीही अमित शाह यांच्या वक्तव्यावरुन निशाणा साधला. "गृहमंत्र्यांनी ९० मिनिटांचे प्रवचन दिले. पहिली दुरुस्ती (नेहरू सरकारच्या काळात) का आणली गेली याचा उल्लेख त्यांनी केला नाही. जमीनदारी काढण्यासाठी आणलेले कायदे रद्द करण्यात आले म्हणून ते आणले गेले. दुसरे कारण म्हणजे आरक्षण वाचवणे. कारण सर्वोच्च न्यायालयाने मद्रासमध्ये दिलेले आरक्षण रद्द केले होते. अमित शाह यांनी अतिशय घृणास्पद गोष्ट सांगितली आहे. यावरून भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रचंड द्वेष असल्याचे दिसून येतो," असं जयराम रमेश यांनी म्हटलं.