Rahul Gandhi : "थोडासा दबाव पडताच पलटले..."; राहुल गांधींचा नितीश कुमारांना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 16:56 IST2024-01-30T16:43:41+5:302024-01-30T16:56:19+5:30
Rahul Gandhi : इंडिया आघाडीला धक्का बसल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच नितीश कुमार यांच्याबद्दल विधान केलं आहे.

Rahul Gandhi : "थोडासा दबाव पडताच पलटले..."; राहुल गांधींचा नितीश कुमारांना खोचक टोला
बिहारमधील राजकीय घडामोडींमुळे इंडिया आघाडीला धक्का बसल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच नितीश कुमार यांच्याबद्दल विधान केलं आहे. त्यांनी नाव न घेता बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले की, थोडासा दबाव पडताच त्यांनी (नितीश कुमार) यू-टर्न घेतला. पण दबाव का? कारण आम्ही जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे मांडत आहोत. भारत जोडो न्याय यात्रा बिहारमध्ये दाखल झाली आहे.
राहुल गांधी म्हणाले की, "अखिलेशजी यांचं भाषण सुरू असताना बघेलजी यांनी मला एक विनोद सांगितला. तुमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल एक विनोद आहे. आपले मुख्यमंत्री शपथ घेण्यासाठी राज्यपालांच्या ठिकाणी गेले. मोठा जल्लोष झाला. तेथे भाजपा नेते आणि राज्यपाल बसले होते. मुख्यमंत्री आणि मंत्रिपदाची शपथ घेतली जाते. त्यानंतर ते सीएम हाऊसकडे रवाना झाले."
"कारमध्ये त्यांना आपली शाल राज्यपालांच्या घरी विसरल्याचं लक्षात येतं. यावर ते ड्रायव्हरला राज्यपालांच्या घरी परत जाण्यास सांगतात. राज्यपालांकडे गेले आणि दरवाजा उघडताच राज्यपाल म्हणाले, 'अरे, तुम्ही इतक्या लवकर आलात का?' अशी बिहारची अवस्था आहे. थोडासा दबाव येताच यू-टर्न घेतात."
"नितीशजी का अडकले ते समजून घ्या. मी त्यांना थेट सांगितलं की तुम्हाला बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना करावी लागेल. आरजेडीसह नितीशजींनी सर्वेक्षण करण्याचा आग्रह धरला. मात्र भाजपा घाबरला. ते या योजनेच्या विरोधात आहेत. नितीशजी अडकले आणि भाजपाने त्यांना पळून जाण्यासाठी मागच्या दाराने जागा दिली. लोकांना सामाजिक न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आमच्या आघाडीची आहे आणि त्यासाठी आम्हाला नितीशजींची गरज नाही" असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.