भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होणार 26 Rafale M लढाऊ विमानं; फ्रान्ससोबत चर्चा सुरू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 14:56 IST2024-06-14T14:54:59+5:302024-06-14T14:56:06+5:30
हे विमान पाकिस्तानकडे असलेल्या F-16 आणि चीनच्या J-20 पेक्षा खूप चांगले आहे.

भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होणार 26 Rafale M लढाऊ विमानं; फ्रान्ससोबत चर्चा सुरू...
नवी दिल्ली- देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकार सातत्याने अत्याधुनिक विमाने-हेलिकॉप्टरसह विविध शस्त्रे खरेदी करण्यावर भर देत आहे. अशातच भारत आणि फ्रान्स सरकारमध्ये 26 राफेल मरीन (Rafale M) जेट खरेदी करण्यासाठी चर्चा सुरू झाली आहे. विमान कराराबाबत दोन्ही देशांमधील चर्चा 30 मे पासून सुरू होणार होती, परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात ढकलण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांमधील हा करार सूमारे 50 हजार कोटी रुपयांचा आहे. या कराराअंतर्गत फ्रान्स, भारताला 26 राफेल मरीन विमाने देईल. यासाठी फ्रान्सचे एक शिष्टमंडळ नवी दिल्लीत आले आहे.
येथे तैनात केले जातील
फ्रान्सकडून आलेले हे 26 राफेल मरीन लढाऊ विमाने भारतीय नौदलाच्या INS विक्रांत आणि INS विक्रमादित्यवर तैनात केले जातील. विशेष म्हणजे, गेल्यावर्षीपासून यासाठी प्रयत्न केले जात होते.
राफेल मरीनची खासियत
राफेल मरीन फायटर जेट हे खास सागरी क्षेत्रात हवाई हल्ल्यांसाठी तयार करण्यात आले आहे. हे विमानवाहू जहाजांवर उतरण्यास सक्षम असून, याचे पंख फोल्ड करण्यायोग्य आहेत. हवाई दलाच्या राफेल विमानांचे पंख दुमडता येत नाहीत. राफेल-एम एका मिनिटात 18 हजार मीटरची उंची गाठू शकते. हे विमान पाकिस्तानकडे उपलब्ध असलेल्या F-16 किंवा चीनकडे उपलब्ध असलेल्या J-20 पेक्षा खूप चांगले आहे. हवाई दलाच्या राफेलप्रमाणे या विमानातही हवेत इंधन भरण्याची क्षमता आहे.