राफेलपासून पुलवामापर्यंत, लोकसभा निवडणुकीत गाजणार हे सहा मुद्दे 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 05:02 PM2019-03-11T17:02:07+5:302019-03-11T17:06:09+5:30

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची कसोटी लागणार असून, विविध मुद्द्यांवरून मोदी आणि भाजपाला घेरण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत राफेल विमान करारापासून ते पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यापर्यंतचे मुद्दे गाजणार आहेत.

Rafale Deal to pulwama attack; this Six issues that will be played key role in this Lok Sabha Election | राफेलपासून पुलवामापर्यंत, लोकसभा निवडणुकीत गाजणार हे सहा मुद्दे 

राफेलपासून पुलवामापर्यंत, लोकसभा निवडणुकीत गाजणार हे सहा मुद्दे 

नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने 17व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम रविवारी जाहीर केला. त्याबरोबरच लोकसभा निवडणुकीचे औपचारिक बिगूल वाजले आहे. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा विरुद्ध इतर विरोधी पक्ष अशीच मुख्य लढत रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची कसोटी लागणार असून, विविध मुद्द्यांवरून मोदी आणि भाजपाला घेरण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत राफेल विमान करारापासून ते पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यापर्यंतचे मुद्दे गाजणार आहेत. पुढच्या सव्वा दोन महिन्यांच्या काळात हे मुद्दे लोकसभा निवडणुकीची दशा आणि दिशा ठरवतील अशी दाट शक्यता आहे.

हे आहेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गाजणारे मुद्दे 

1 - राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा ठरणार कळीचा विषय 
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे आम्ही पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले, असा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे. आमच्या सरकारच्या काळात सर्जिकल स्ट्राइक एअर स्ट्राइक असा धाडसी मोहिमा पार पडल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. तर पुलवामा हल्ल्यावरून काँग्रेस मोदी सरकारला धारेवर धरत आहे. तसेच जवानांच्या शौर्याचा गैरवापर मोदींकडून होत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. त्याबरोबरच राफेल विमान करारामध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून मोदींनी आपल्या मित्रांना फायदा मिळवून दिल्याचा आरोपही काँग्रेसकडून होत आहे. 

2 - शेतकऱ्यांचे प्रश्न 
शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा करून, आश्वासने देऊन भाजपा सरकार सत्तेवर आले होते. शेतकऱ्यांना दिलेले अनुदान, तसेच नव्या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत असलेल्या 6 हजार रुपयांचा प्रचार भाजपाकडून करण्यात येत आहे.  मात्र गेल्या पाच वर्षांत शेतीच्या क्षेत्रात सरकारकडून काम झाले नसल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे. तसेच विविध मुद्द्यांवरून शेतकऱ्यांमध्येही नाराजी आहे. शेतकऱ्यांची दुरावस्था आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या मुद्द्यांवरून काँग्रेसने सरकारची कोंडी केली आहे. त्यामुळे निवडणुकांदरम्यान, शेतकऱ्यांचा प्रश्न कळीचा मुद्दा ठरणार आहे.

  3 - रोजगार 
घटलेला रोजगार आणि बेरोजगारांच्या वाढत्या संख्येचा मुद्दाही यावेळी प्रचारात केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी धडाकेबाज प्रचारसभांमध्ये दरवर्षी दोन कोटी नवे रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात बेरोजगारी वाढली असल्याचे आकडे समोर आले आहेत. त्यामुळे बेरोजगारीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपाची कोंडी केलेली आहे. तसेच रोजगाराच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारमधील नेतेमंडळींची दमछाक होण्याची शक्यता आहे. 
  
4 - घराणेशाही विरुद्ध योजनांच्या अंमलबजावणीतील अपयश  
  घराणेशाहीवरून भाजपाकडून काँग्रेसला सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच प्रियंका गांधींच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशानंतर भाजपाकडून होत असलेल्या घराणेशाहीच्या आरोपांची धार अधिकच तीव्र झाली आहे. मात्र काँग्रेसकडूनही त्याला तितकाच जोरदार प्रतिकार होत आहे. विविध योजनांना आलेले अपयश, अंमलबजावणीमधील अपयश यावरूनही सरकारला घेरण्यात येत आहे. मेक इन इंडिया, शेतकरी, दलित, महिला सुरक्षा याबाबतीत सरकारला आलेल्या अपयशाचा पाढा काँग्रेसकडून वाचण्यात येत आहे. 
   
5 - जात 

भारतातील प्रत्येक निवडणुकीत जात आणि धर्म हे महत्त्वाचे मुद्दे ठरतात. दरम्यान, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून दलितांवर होत असलेल्या अत्याचारात वाढ झाली आहे, असा आरोप काँग्रेसकडून होत आहे. त्यासाठी उना येथील घटना, रोहिल वेमुला प्रकरण तसेच गेल्यावर्षी  2 एप्रिल रोजी भारत बंददरम्यान झालेला हिंसाचार यांचे उदाहरण दिले जात आहे. तर भाजपाकडून आर्थिक निकषावर देण्यात आलेल्या आरक्षणाचा मुद्दा अधोरेखित केला जात आहे. या निर्णयामुळे सवर्ण मतदार आपल्याकडे आकर्षित होईल, असा भाजपाला विश्वास आहे.  

6 - राम मंदिर आणि हिंदुत्व
 1990 नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत राम मंदिर हा महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे. त्यातच स्वबळावर बहुमत मिळाल्यानंतरही भाजपाला राम मंदिराच्या मुद्द्यावर काही आश्वासक अशी कामगिरी करता आली नाही. दरम्यान, सध्या हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असून, तो सोडवण्यासाठी आता मध्यस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह, विश्व हिंदू परिषद आणि  अन्य हिंदू संघटना या मुद्द्यावर आक्रमक आहेत. तर काँग्रेसही आपल्या खांद्यावरील सेक्युलॅरिझमची धुरा सोडून सौम्य हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला आहे. राहुल गांधी हे  गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीवेळी मंदिराना भेटी देत असल्याचे दिसत होते.  त्यामुळे यावेळीही निवडणुकीत राम मंदिर आणि हिंदुत्वाचा मुद्दा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

Web Title: Rafale Deal to pulwama attack; this Six issues that will be played key role in this Lok Sabha Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.