धक्कादायक! मातीची भांडी बनवणाऱ्याला आली १ कोटींची GST नोटीस; संपूर्ण कुटुंब हादरलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 13:50 IST2026-02-20T13:49:25+5:302026-02-20T13:50:29+5:30
मातीची भांडी बनवणाऱ्या मोहम्मद शाहिद यांना चक्क १ कोटी २५ हजार २९७ रुपयांची जीएसटी (GST) नोटीस पाठवण्यात आली आहे.

AI फोटो
उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये प्रशासकीय निष्काळजीपणाचं एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. मातीची भांडी बनवणाऱ्या मोहम्मद शाहिद यांना चक्क १ कोटी २५ हजार २९७ रुपयांची जीएसटी (GST) नोटीस पाठवण्यात आली आहे. ही नोटीस मिळाल्यापासून त्यांच्या कुटुंबात भीतीचं वातावरण पसरलं आहे. शाहिद यांना ही नोटीस मिळाली असून ते प्रचंड घाबरलेले आहेत. त्यांनी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मोहम्मद शाहिद यांना मिळालेल्या नोटिसीनुसार, त्यांची वार्षिक उलाढाल दाखवण्यात आली आहे, जी प्रत्यक्षात शून्य आहे. त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अत्यंत तुटपुंज्या उत्पन्नावर चालतो. हे फसवणुकीचं प्रकरण असल्याचं मानलं जात आहे. मात्र अशा प्रकारची नोटीस मिळाल्याने प्रशासकीय व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हरचंदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रघुवीरगंज बाजारचे रहिवासी मोहम्मद शाहिद यांचा पिढीजात व्यवसाय कुंभारकाम आहे. ते आणि त्यांचं कुटुंब मातीपासून माठ, मडकी, दिवे आणि खेळणी बनवून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचा कोणताही मोठा व्यवसाय, भागीदारी किंवा कारखाना नाही. असं असतानाही त्यांना नोटीस मिळाली. नोटिसीत असा दावा करण्यात आला आहे की, शाहिद यांच्या नावाने बिहारमधील सिवान येथे 'भारत एंटरप्रायझेस' नावाची फर्म जीएसटीमध्ये नोंदणीकृत आहे. या फर्मच्या माध्यमातून २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षांत कोट्यवधींचा कर थकीत आहे, जो एकूण १,००,२५,२९७ रुपये इतका होतो.
याबाबत बोलताना शाहिद यांनी सांगितलं की, "हे नक्कीच एखादं मोठं कारस्थान आहे. माझी कोणतीही फर्म किंवा मोठा कारखाना नाही. मी तर शिक्षितही नाही. माझ्या पॅन कार्डचा कुणीतरी चुकीचा वापर केला असावा." त्यांनी अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाचा तपास करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. या नोटिसीमुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब मानसिक धक्क्यात आहे. या प्रकरणावर स्थानिक जीएसटी अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य दिलेलं नाही.