युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 07:22 IST2025-10-02T07:17:21+5:302025-10-02T07:22:02+5:30
या महत्त्वाच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू असून पुतिन एका दिवसासाठी येणार की दोन दिवसांसाठी येणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दौऱ्याचे सविस्तर तपशील निश्चित करण्यासाठी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव नोव्हेंबरमध्ये भारतात येणार आहेत.

युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
नवी दिल्ली: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन ५ डिसेंबरच्या सुमारास भारतात येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणाऱ्या वार्षिक शिखर परिषदेत द्विपक्षीय संबंधांना नव्या टप्प्यावर नेणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी बुधवारी दिली.
या महत्त्वाच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू असून पुतिन एका दिवसासाठी येणार की दोन दिवसांसाठी येणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दौऱ्याचे सविस्तर तपशील निश्चित करण्यासाठी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव नोव्हेंबरमध्ये भारतात येणार आहेत.
अध्यक्ष पुतिन यापूर्वी २०२१ मध्ये नवी दिल्लीला आले होते. यावेळी शिखर परिषदेसोबत भारत-रशिया आंतरसरकारी लष्करी व तांत्रिक सहकार्य आयोगाची बैठक होण्याचीही शक्यता आहे.
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
एस-४०० प्रणालीचा मुद्दा
२०१८ मध्ये भारताने ५ अब्ज डॉलर्सचा करार करून रशियाकडून पाच एस-४०० हवाई संरक्षक क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेतली होती.यापैकी तीनचा पुरवठा झालेला असून उर्वरित दोन युनिट्सचा पुरवठा २०२६ मध्ये होणार आहे. युक्रेन युद्धामुळे वेळापत्रक पुढे ढकलले गेले.
शिखर परिषद अजेंडा
धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करणे
संरक्षण, व्यापार, ऊर्जा आणि सुरक्षेतील सहकार वाढवणे
युक्रेन संघर्षासंबंधी चर्चा
आंतरराष्ट्रीय संदर्भ
चीनमधील तियानजिन येथे झालेल्या शांघाय सहकार संघटनेच्या परिषदेच्या निमित्ताने मोदी-पुतिन यांची भेट झाली. अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क दुपटीने वाढवले गेले असतानाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली. मोदी यांनी या बैठकीत पुतिन यांना, भारताचे १४० कोटी नागरिक डिसेंबरमधील तुमच्या भारतदौ-याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत, असे सांगत स्वागत केले होते. त्यांनी असेही नमूद केले की, भारत-रशिया संबंध दोन्ही देशांसाठीच नव्हे तर जागतिक शांतता व स्थैर्यासाठीही महत्त्वाचे आहेत.