भयंकर! पूर्वांचल एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात; कॉन्स्टेबलच्या कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 11:17 IST2025-12-11T11:16:39+5:302025-12-11T11:17:24+5:30
उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे पूर्वांचल एक्सप्रेस-वेवर एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल जावेद यांचं संपूर्ण कुटुंब संपलं.

भयंकर! पूर्वांचल एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात; कॉन्स्टेबलच्या कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे पूर्वांचल एक्सप्रेस-वेवर एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल जावेद यांचं संपूर्ण कुटुंब संपलं. एका भरधाव ब्रेझा कारने मागून वॅगन आर कारला जोरदार धडक दिली, ज्यामुळे कारचा CNG टँक फुटला आणि मोठी आग लागली. या भीषण अपघातात दोन महिला आणि तीन मुलांसह एकूण ५ लोकांचा जागीच मृत्यू झाला.
बाराबंकीमधील भीषण अपघातात आझमगढ येथे तैनात असलेले पोलीस कॉन्स्टेबल जावेद यांची पत्नी आणि मुलांसह ५ लोकांचा मृत्यू झाला. जावेद यांना या दुःखद घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्यांचं कुटुंब मऊहून लखनौकडे जात होतं. तेव्हाच एका भरधाव वेगात असलेल्या ब्रेझा कारने मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर कारचा CNG टँक फुटला आणि आग लागली.
अपघातात वॅगन आर कारमध्ये बसलेल्या दोन महिला आणि तीन मुलं होरपळली. आग लागल्यानंतर ते कारचा दरवाजाही उघडू शकले नाहीत. पोलीस आणि स्थानिक लोकांनी ५ लोकांना बाहेर काढलं, परंतु त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. गुलिशता, समरीन, इलमा, इश्मा, जियान अशी मृतांची नावं आहेत.
बाराबंकीचे डीएम शशांक त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वांचल एक्सप्रेस-वेवर झालेल्या भीषण अपघातात ५ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि जखमींना ट्रॉमा सेंटरमध्ये नेलं आहे. अपघातानंतर पोलिसांनी दोन्ही गाड्या ताब्यात घेतल्या असून तपास करत आहेत. अपघात केवळ वेगामुळे झाला की चालकाला झोप लागली होती, याचा पोलीस शोध घेत आहेत.